उंब्रज : ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’, ’येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष, भंडारा खोबर्याची उधळण आणि वेद-मंत्रांच्या अक्षताच्या जयघषोत महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणार्या पाल (ता. कराड) येथील श्री खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा लाखो भाविकांच्या साक्षीने सायंकाळी गोरज मुहूर्तावर मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. दरम्यान, खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा-खोबर्याच्या उधळणीने पिवळा धमक झाला होता.
भक्तांचा पाठीराखा म्हणून ओळखल्या जाणार्या श्री खंडोबास बोहल्यावर चढताना पाहण्यासाठी यावर्षीही भाविकांचा जनसागर लोटला होता. कोणताही अनुचित प्रकार नाही, कोणताही दंगा नाही सर्व काही प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी यांनी केलेल्या योग्य व शिस्तबध्द नियोजनाप्रमाणे यात्रा शांततेत पार पडल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
खंडोबा व म्हांळसा यांच्या शाही विवाह सोहळयासाठी राज्या परराज्यातून आलेले खंडोबाचे मानकरी, मानाच्या सासन काठ्या, मानाचे गाडे, मानाची पालखी यासह मानकरी यांना रथातून घेवून निघालेली शाही मिरवणूक भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. दुपारी 3 वा.च्या सुमारास देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांचे रथातून मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सर्व विधी आटोपून दुपारी 3.30 वा.च्या सुमारास मानकरी देवराज पाटील देवास पोटास बांधून अंधार दरवाजाजवळ आले. याठिकाणी ते रथात विराजमान झाले व तेथून मुख्य मिरवणूकीस प्रारंभ झाला.
फुलानी सजविलेल्या छत्र्या, चोपदारांचा घोडा, सासनकाठी, पालखी, मानाचे गाडे व त्यापाठोपाठ राजेशाही थाटात श्री खंडोबा व म्हांळसा यांना रथातून घेवून निघालेले मानकरी अशी भव्य दिव्य शाही मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा खोबर्याची उधळण करीत ’यळकोट यळकोट जयमल्हार’, सदानंदाचा येळकोट येळकोट’, खंडोबाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करीत देवाचे दर्शन घेतले. तर तारळी नदीपात्रातील दक्षिण पात्र भंडारा खोबरे उधळण्यासाठी भाविकांनी खच्चाखच भरले होते.
मुख्य मिरवणूक पूलावरून तारळी नदी पात्रात येताच लाखो भाविकांनी भंडारा खोबर्याची उधळण करीत खंडोबा व म्हाळसा यांचा जयजयकार केला. लाखो भाविकांनी खचाखच भरलेले तारळी नदीचे दक्षिण पात्र भंडार्याने पिवळे धमक झाले होते. सायंकाळी मुख्य मिरवणूक तारळी नदीपात्रातून मारूती मंदिर मार्गे बोहल्याजवळ आली. यावेळी खंडोबाच्या जयजयकारांने परिसर दुमदुमून गेला. देव मंडपात आल्यानंतर मानकरी देवराज पाटील यांनी देवास बोहल्यावर चढविले व पारंपारीक पध्दतीने लाखो भाविकांच्या साक्षीने गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात झाला.
प्रशासनाने यात्रापूर्व नियोजन बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार प्रशासनाचे सर्व विभाग अलर्ट होते. तसेच काशिळ पाल मार्गावरून येणारे भाविक थेट वाळवंटात सोडले जात होते. तर हरपळवाडी या मार्गावरून व मंदिरातून येणारे भाविक नदीच्या उत्तर वाळवंटात साकव पूलावरून सोडले जात होते. यात्रा शांततेत पार पाडल्याबद्दल देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर, गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार तहसीलदार कल्पना ढवळे, उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र भोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, सरपंच सौ. सुनिता घाडगे, उपसरपंच गणेश खंडाईत, यात्रा कमिटीचे चेअरमन प्रशांत दळवी, ग्रामपंचायत प्रशासन, यात्रा कमिटी यांनी भाविकांना धन्यवाद दिले. तसेच यात्रेस आलेल्या भाविकांना श्री खंडोबाचे दर्शन विनासायास मिळावे यासाठी देवस्थान ट्रस्टने केलेल्या शिस्तबध्द दर्शनबारीचेही भाविकांकडून स्वागत होत होते.
उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व मंदिर परिसरात तसेच मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच काशिळ पाल, वडगाव, पाल, हरपळवाडी, पाल आदी मार्गावर वाहतूक सुरळीत होण्याच्या अनुषंगाने पोलिस तैनात करण्यात आले होते. तसेच जिल्हा गुन्हा शाखेचे कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्याबरोबरच खासगी कमांडो पथक तैनात करण्यात आले होते.