पाचगणी : महाबळेश्वर - पाचगणीमध्ये दिवाळी सुट्ट्यांमधील पर्यटनाचा हंगाम सुरू होणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर-पाचगणी मार्गावरून दररोज हजारो पर्यटकांची वर्दळ असणार आहे. मात्र, या मुख्य मार्गाची दुर्दशा झाल्याने व रस्त्यावर धुरळा उडत असल्याने पाचगणीकरांसह पर्यटकही त्रस्त होत आहेत.
संपूर्ण रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबर आणि जमा झालेली खडी यामुळे वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. यातच रस्त्यावरील धूळीची भर पडत आहे. खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका वाढला असून चारचाकी वाहनांनाही धक्काबुक्की करत प्रवास करावा लागत आहे. धुळीमुळे वाहनचालकांना पुढील रस्ता दिसेनासा होतो. त्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढला आहे. सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी आलेले पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत.
या मार्गावरून दररोज नोकरी, व्यवसाय, शाळा-कॉलेजसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीत खड्डेमय रस्ता पार करणे कठीण झाले आहे. गेल्या काही दिवसांत किरकोळ अपघातांच्या घटनाही घडल्या असून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
सणासुदीच्या गर्दीत प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी. खड्डे मुजवावेत आणि धुरळा रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.