पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ पाचगणी सध्या रिमझिम पावसात न्हालं असून, पांढर्या शुभ्र धुक्याच्या सळसळत्या पडद्याने संपूर्ण परिसर सौंदर्याने नटलेला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पाचगणी पठारावर धुक्याची चादर दिसत आहे. पावसाच्या सरी आणि धुक्याची दुलई यामुळे पाचगणीचं वातावरण थेट स्वर्गीय भासू लागलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाचगणी परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे. यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे. थंडगार वार्यांची झुळूक आणि धुक्याने आच्छादलेली टेकड्यांची रांग पर्यटकांना वेड लावत आहे. अतिशय अल्हाददायी वातावरण, निळे आभाळ आणि त्यावर धुक्याची चादर, असे मोहित करणारे दृश्य पाहायला मिळत आहे.
काश्मीर म्हणून ओळख असलेल्या पाचगणी- महाबळेश्वरच्या वातावरणात क्षणात बदल होतात. पावसाच्या सरी आणि पांढरे शुभ्र धुके पसरते.
येणार्या पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरते. विविध पॉईंटवरील रस्ते दाट धुक्यात हरवल्याने वाहनांच्या दिव्यांच्या प्रकाशात प्रवास करताना वेगळा अनुभव पर्यटकांना येथे येत आहे. शनिवारी आणि रविवारी सुट्यांमुळे अनेक पर्यटकांनी पाचगणी आणि जवळील महाबळेश्वरकडे मोठ्या प्रमाणावर धाव घेतली आहे. ‘टेबल लँड’, ‘सिडनी पॉइंट’ आणि इतर प्रमुख ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.
तालुक्याला नैसर्गिक देणगी लाभलेले टेबल लँड हे पठार उंच ठिकाणांपैकी एक आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या पाचगणी पठारावर रिमझिम पडणार्या पावसामुळे हिरवीगर्द वनराई बहरली आहे. डोंगर रांगातून पसरलेले विस्तीर्ण प परिसर हिरवाईने नटलेले डोंगर, कड्या-कपारीतून झुळझुळ वाहणारे छोटे-मोठे धबधबे, पर्यटकांना खुणावत आहेत.