पाचगणी : स्वच्छता पुरस्कार प्राप्त पाचगणीत नगरपालिका क्षेत्रात कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या घंटागाड्यांमध्ये गोळा झालेला कचरा डेपोवर नेवून टाकला जातो. मात्र, कचरा गोळा झाल्यानंतर त्यावर प्लास्टिकचा कागद किंवा तो कचरा झाकला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत पालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
पाचगणीत दररोज ट्रॅक्टरद्वारे कचरा गोळा केला जातो. या कचर्यामध्ये मुख्यतः हॉटेलमधील उरलेले अन्न, प्लास्टिक आणि सडलेला जैविक कचरा असतो. हा कचरा गार्बेज बॅगमधून काढून उघड्यावरच ट्रॅक्टरमध्ये ढिगाने टाकला जातो. परिणामी, कचरा गोळा करताना त्यामुळे दुर्गंधी सर्वत्र पसरते. विशेषतः सकाळी शाळा, बाजारपेठा आणि वस्ती भागात नागरिकांना नाकातोंड झाकून चालावे लागते. सकाळी जेव्हा शाळा सुरू होण्याची वेळ असते. त्याच वेळी ही कचरागाडी मुख्य रस्त्यांवरून फिरते. त्यामुळे शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कधी कधी गाडीतून कचरा रस्त्यावर सांडतो. यामुळे अस्वच्छतेचे आणि रोगराईचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शहरात स्वच्छता राखण्यासाठी उघड्या कचरागाड्यांवर बंदी घालून बंदिस्त वाहतूक करणे आवश्यक आहे. विशेषतः मुख्य रस्त्यावरील शाळेच्या वेळेआधी कचरा गोळा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. पर्यटन हंगामात पाचगणीत हजारो पर्यटक येत असतात. अशावेळी पाचगणी सारख्या हिलस्टेशनचे सौंदर्य मालिन होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापनासाठी बंदिस्त वाहनांचा वापर करावा आणि उपायोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.