कराड : हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी)साठी राज्य शासनाने वाहन चालकांना यापूर्वी दोनदा मुदतवाढ दिली आहे. मात्र त्यानंतरही कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी झालेल्या 1 लाख 63 हजारांपैकी केवळ 20 हजार वाहन चालकांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तर 30 हजार 429 वाहन चालकांनी या नंबर प्लेटसाठी नोंदणी प्रकिया पूर्ण केली आहे. त्यामुळेच अजूनही 1 लाख 12 हजाराहून अधिक वाहन मालक व चालकांनी या नंबर प्लेट लावण्याकडे दुर्लक्षच केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सोमवार, 16 जूनपासून संंबंधितांच्या अडचणी वाढणार आहेत.
कराडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास सन 2010 साली प्रारंभ झाला. त्यानंतर 1 एप्रिल 2019 पूर्वी या कार्यालयातून 1 लाख 63 हजार 217 वाहनांची नोंदणी या कार्यालयातून करण्यात आली होती. या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी अथवा नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुसर्यांदा 30 जूनपर्यत मुदतवाढ देण्यात आली होती. तत्पूर्वी 31 मार्च 2025 पर्यंत केवळ 20 हजार 12 वाहन चालक व मालकांनी एचएसआरपी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करत आपआपल्या वाहनांना नंबर प्लेट बसविल्या होत्या. त्यामुळेच 30 जूनपर्यत मुदतवाढ देण्यात आली होती.
मात्र या कालावधीत केवळ 30 हजार 429 वाहन चालकांसह मालकांनी एचएसआरपी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे एकट्या कराड कार्यालयात नोंदणी झालेल्या वाहनांपैकी 1 लाख 12 हजार 775 वाहन चालक व मालकांनी एचएसआरपी नंबर प्लेटसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने राज्यातील वाहन चालकांची संख्या किती मोठी असेल ? हे यावरूनच स्पष्ट होत आहे. आता शासनाने 16 जून 2025 पासून एचएसआरपी नंबर प्लेट असल्याशिवाय जुन्या दुचाकी तसेच अन्य कोणत्याही प्रकारच्या वाहनांचे व्यवहार केले जाणार नाहीत, असे परिपत्रकच काढले आहे.
वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, मोबाईल नंबर बदल, फायनान्स हायपोथिकेशन जोडणे अथवा काढणे, डुप्लिकेट आरसी देणे, ना हरकत प्रमाणपत्र देणे यासह वाहन विषयक कोणतेही काम जुन्हा वाहन चालक व मालकांना करताच येणार नाही. एचएसआरपी नंबर प्लेट नसणार्या जुन्या वाहनांचे खरेदी - विक्री व्यवहार सुद्धा उपप्रादेशिक परिवनह कार्यालयाकडून ग्राह्य मानले जाणार नाहीत. याशिवाय भविष्यात एचएसआरपी नंबर प्लेट नसणार्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई होणार असून सुमारे 1 हजार रूपये भरावे लागणार आहेत.