सातारा

Shivendraraje Bhosale | भाजपच्या निर्णयावर विरोधक टपून बसलेत : ना. शिवेंद्रराजे भोसले

उमेदवारीचा निर्णय घाईत घेणार नाही

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महाविकास आघाडीला सातारकरांची साथ नाही. हे नगरपालिका निवडणुकीसाठी नुकत्याच त्यांनी घेतलेल्या मुलाखतींमधून दिसून आले आहे. आता आमच्यातील कोण हाताला लागतेय का? यावर महाविकास आघाडी टपून बसली आहे. त्यामुळे सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या उमेदवारी देण्याचा निर्णय घाईगडबडीत न घेणे, हेच राजकीयदृष्ट्या शहाणपणाचे ठरणार आहे, असे मत ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले.

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने मिळवलेल्या यशाबद्दल येथील मोती चौकामध्ये ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अमोल मोहिते, जयवंत भोसले, अशोक मोने, विजय बडेकर, सुवर्णा पाटील, विकास गोसावी, विजय काटवटे, धनंजय जांभळे, किशोर गोडबोले, रेणू येळगावकर, सुनेशा शहा, सिद्धी पवार, अंजली कुलकर्णी, नंदा इंगवले, वैशाली टंकसाळे, अश्विनी हुबळीकर उपस्थित होत्या.

ना. शिवेंद्रराजे म्हणाले, बिहारचा निकाल हा काँग्रेसला तेथील जनतेने दिलेली चपराक आहे. आता विरोधक नवीन काही काढतील. निवडणुकीत मशीन वापरले म्हणतील. वास्तविक, काँग्रेसच्या कारभाराला देशातील जनता वैतागली आहे. याउलट भाजप सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे. या यशाबद्दल विरोधकांचे काहीही मत असले तरी जो जिता वही सिंकंदर... हे जनतेने दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे खरे सिकंदर आहेत.

सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकपदांच्या उमेदवारीबाबत भाजपने एवढी गोपनीयता का बाळगली आहे? आणि उमेदवारी यादी कधी जाहीर केली जाणार? याबाबत विचारले असता ना. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून 400 ते 425 लोकांनी मुलाखती दिल्या आहेत. सर्वजण तुल्यबळ आहेत. नगराध्यक्षपदाची उमेदवारी देताना निरनिराळ्या प्रभागातून निर्णय करावा लागणार आहे. लोकांना अपेक्षित उमेदवार आम्हाला द्यायचा आहे. योग्य काम करणाऱ्या उमेदवाराला न्याय दिला पाहिजे. जो व्यक्ती प्रभागातील लोकांसाठी झटलाय त्याच्यावर अन्याय होऊ नये, यामुळे थांबून निर्णय घेत आहोत. विरोधकांना चांगले उमेदवारच मिळाले नाहीत, त्यामुळे आमच्या निर्णयावर विरोधक टपून बसले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, बिहारच्या जनतेचे सातारकरांच्यावतीने मी अभिनंदन करतो, असे सांगून ना. शिवेंद्रराजे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारा बिहारचा निकाल आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची सर्व बाजूने घोडदौड सुरु आहे. ही निवडणूक काँग्रेस आणि राहुल गांधी आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने जो वोट चोरीचा आरोप केला होता, त्याला चपराक देणारा आहे. त्यानंतरही विरोधक बिहारमध्ये यश मिळवू शकले नाहीत. विरोधकांनी मोदी, शहा यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. जनता विकासाच्या मागे राहते, हेच बिहारमध्ये बघायला मिळाले. महाराष्ट्रातही आम्ही ना. देवेेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. कुणी कितीही धूळफेक केली तरी आम्ही राज्यात यशस्वी होऊ, असेही ना. शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT