खटाव : माण - खटाव विधानसभा मतदारसंघात गेल्या सहा महिन्यांपासून भाजपमध्ये सुरू असलेले इनकमिंग आता आणखी वेगवान झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर सर्जिकल स्ट्राईक करत ऑपरेशन लोटसची तीव्रता वाढवली आहे.
आज बुधवारी अजितदादा गटाचे खटाव तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष नंदकुमार मोरे आणि शरद पवार गटाचे माण तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष बाळासाहेब सावंत तसेच दोन्ही राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी हे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सिध्दनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे यांनी दिली.
माण - खटावच्या राजकारणात प्रत्येक निवडणुकीपूर्वी अनेक ट्विस्ट येतात. तसेच ट्विस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. राजकीय कोलांटउड्यांना जोर आला आहे. दोन्ही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. ना. जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर गाव पातळीवरील अनेक भाजप पक्षप्रवेश गेल्या सहा महिन्यांपासून सुरु आहेत. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधातील हेवीवेट पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये घेऊन ना. गोरे मोठा सर्जीकल स्ट्राईक करत आहेत.
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री गोरेंच्या संपर्कात आहेत. तसे ते विधानसभा निवडणुकीपूर्वीही गुप्तपणे त्यांच्या संपर्कात होते. माजी आमदार प्रभाकर घार्गेंशी त्यांचे चांगलेच फाटले आहे. दोघांनी एकमेकाविरोधात जिल्हा बँकेची निवडणूक लढवली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील घार्गे आता अजित पवारांच्या सत्तेतील राष्ट्रवादीत जाणार असल्याची शक्यता गडद झाली आहे. घार्गेंशी कधीच पटणार नाही, असे उघड उघड बोलणारे नंदकुमार मोरे त्यामुळेच भाजपमध्ये येणार असल्याचे गेल्या दोन महिन्यांपासून ऐकायला मिळत होते. आता त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.
बुधवारी दुपारी नंदकुमार मोरे यांच्यासह माजी उपसभापती बाळासाहेब माने हिवरवाडीकर, माजी उपसभापती हिराचंद पवार चितळीकर, शंकरराव मोरे (दातेवाडी), मुरली भुशारी, बबन कदम, सुरेश पाटील, जयवंत घाडगे, राकेश चवर, अतुल यलमर, महेंद्र देशमुख, बापूराव घाडगे आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मोरेंसह इतर पदाधिकाऱ्यांचा भाजप पक्षप्रवेश निमसोड, कातरखटाव गटासह खटाव तालुक्याच्या राजकारणावर नजरेत भरणारा परिणाम करणार आहे.
माण तालुक्यातील शरद पवार गटालाही ना. गोरे यांनी चांगलाच झटका दिला आहे. तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत त्यांच्या सहकाऱ्यांसह भाजपचे कमळ हाती घेत आहेत. त्यांच्याबरोबर नगरसेवक सुरज गुंडगे, नगरसेवक महेश जाधव, राजेंद्र साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक राजेंद्र रामचंद्र साळुंखे, स्वीकृत नगरसेवक दत्तात्रय अवघडे, नगरसेविका वर्षाराणी सावंत, सोसायटी चेअरमन वैशाली सावंत, संचालक संजय जाधव, दत्तात्रय जाधव, प्रकाश जाधव, दीपक म्हेत्रे, राजेंद्र जाधव, प्रसाद जाधव लालासाहेब अवघडे, साईनाथ जाधव, माजी नगरसेवक लक्ष्मण खताळ, राजेंद्र महाडिक आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती अरुण गोरे यांनी दिली.
खटाव आणि माण या दोन्ही तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी भाजपची विचारधारा स्वीकारत असल्याने आगामी निवडणुकांवर या घडामोडींचा परिणाम होणार आहे. जोरदार इनकमिंगमुळे भाजपचे पारडे जड होणार आहे.