सातारा : खा. शरद पवारसाहेबांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणताही संदेश आमच्यापर्यंत दिलेला नाही. तसेच जी काही चर्चा सोशल मीडियावर चालू आहे ती फक्त चर्चाच आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आ. रोहित पवार यांनी दिली.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमास ते आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आ. पवार पुढे म्हणाले, आमच्याकडे दहा आमदार असून त्यातील काही आमदारांची इच्छा सत्तेत राहून काम होत असतील तर आपण सत्तेत गेलं पाहिजे अशी आहे. याबाबत चर्चा झाली असावी. आता या विषयात बोलणं योग्य ठरणार नाही.
जेव्हा खा. शरद पवार पक्षाची बैठक बोलावतील तेव्हा नक्कीच माझं मत मी मांडेन. पवारसाहेब वारंवार म्हणत आहेत आम्ही आता पुढच्या पिढीला जबाबदारी देणार आहोत. त्यामुळे पुढची पिढी देखील त्याबाबतचा निर्णय घेईल, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. तसेच खासदार सुप्रियाताई व आमची चर्चा होईल असे सांगत पक्षातील इतर आमदार आणि पदाधिकार्यांबरोबर या चर्चेत नेमका काय निर्णय होईल तो आम्ही सर्वांना सांगणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.