खटाव : खटाव तालुक्याच्या बहुतांश भागावर मंगळवारी पहाटेपासून सकाळी साडेसात वाजेपर्यंत दाट धुक्याची चादर पसरली होती. अचानक पडलेल्या धुक्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतातूर झाले आहेत. खरीपाच्या इतर पिकांनाही हे धुके कमी अधिक प्रमाणावर हानीकारक ठरणार आहे. धुक्यामुळे दहा फुटांवरील दृष्यमानताही कमी झाल्याने रहदारीही चांगलीच मंदावली होती. दरम्यान, पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खटाव तालुक्यावर यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी दाखवल्यामुळे खरीप हंगामाने शेतकर्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. सध्या काही पिकांची काढणी सुरु आहे. काही भागात कांद्याच्या रोपांची लागण झाली आहे तर काही भागात कांदा लागवड उशीरा सुरु आहे. शेतकर्यांची अशी लगबग सुरु असतानाच मंगळवारी पहाटे तालुक्याच्या बहुतांश भागावर दाट धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळाली. उत्तर भागातील मोळ, मांजरवाडीपासून बुध, डिस्कळ, ललगुण, पुसेगाव, खटाव परिसरात सकाळी साडेसात वाजेपर्यंत धुके पसरले होते. या धुक्यामुळे कांद्याच्या रोपांना मार बसण्याची शक्यता आहे. इतर पिकांनाही हे धुके नुकसानकारक ठरणार आहे. बराच वेळ धुके असल्याने रहदारीही मंदावली होती. दिवस उगवला तरी लाईट सुरु ठेवून वहाने चालवावी लागत होती.
दरम्यान, मंगळवारी दिवसभर कमालीचा उष्मा जाणवत होता. सायंकाळी तालुक्याच्या बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे खटावमध्ये आठवडा बाजारात ग्राहक आणि विक्रेत्यांची तारांबळ उडाली.