कराड : येथील कोयना नदीत बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. विक्रम प्रकाश कडव (वय 44, रा. आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत नंदकुमार प्रकाश कडव यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम कडव हे बंधू नंदकुमार कडव यांच्यासोबत आगाशिवनगर येथे वास्तव्यास होते. रविवारी सकाळी ते घरातून आंघोळीसाठी बाहेर पडले होते. मात्र, ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, दुपारी जुन्या कोयना पुलाजवळील विटभट्टी शेजारी कोयना नदीच्या पात्रात एका पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. स्थानिक नागरिकांनी याबाबत माहिती दिल्यानंतर हा मृतदेह विक्रम कडव यांचा असल्याचे त्यांच्या बंधूंनी ओळख पटवली.
घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेमुळे आगाशिवनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.