मेढा : जावली तालुक्यातील सनपाने या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या ओमकार पवार यांनी झेडपीच्या सीईओ पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांनी आता नाशिक जिल्ह्याचा कारभार स्वीकारला आहे.
जावली तालुक्यातील पहिले आय.ए.एस. अधिकारी म्हणून ओमकार पवार यांची 2022 निवड झाली आहे. सनपाने येथील फोटोग्राफर व सामान्य शेतकरी कुटुंबातील मधुकर पवार यांचे चिरंजीव ओमकार पवार यांनी यु.पी.एस.सी परिक्षेत घवघवीत यश मिळवले होते. नाशिकचे सीईओ अधिकारी होण्याचा मान मिळवताच त्यांच्या यशाबद्दल जावलीकरांच्यावतीने सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ओमकार पवार सनपाने येथील जि.प. शाळेतच शिकल्याने अभ्यास सुध्दा घरीच केला होता. पण घरी त्यांचे वडिल मधुकर पवार, काका संजय पवार, तानाजी पवार यांनी दिलेले बळ व त्यांनी घेतलेले परिश्रम कायम नजरे समोर ठेवल्याने त्याना आज यशाचे शिखर गाठता आले आहे.
स्पर्धा परीक्षेतून हैदराबाद येथे पोस्टिंग मिळाली. मात्र, आयएएस होऊन अधिकारी होण्याचा ध्यास पूर्ण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच होते. अखेर 196 वी रँक मिळवत आयएएस झाले. 2023 ला प्रोबेशनरी सहायक जिल्हाधिकारी म्हणून गडचिरोली येथे सेवा केली. गेल्या 8 महिन्यांपासून इगतपुरी उपविभागीय अधिकारी म्हणून नाशिक येथे ते कार्यरत होते. आता त्यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाचा कारभार स्वीकारला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर माझी झालेली नियुक्ती आनंददायी आहे. मला नाशिकमध्ये काम करायला आवडेल. जिल्ह्यातील आरोग्य, शैक्षणिक समस्या, प्रश्नांची सोडवूणक करण्यासह जिल्हा परिषदेचे कामकाज सुरळीत करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा जिल्ह्यातील जावली या माझ्या मायभूमीने जे संस्कार दिले आहेत. ते कधीही मी विसरणार नाही. माझ्या या वाटचालीत अनेकांचे ऋण आहेत, याची मला जाणीव राहील.- ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.