पिंपोडे बुद्रुक : कमलाकर खराडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत उत्तर कोरेगाव तालुका हा या पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. पक्षांतर्गत कुरबुरी सर्वत्रच पाहायला मिळतात. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सोनके ता. कोरेगाव येथे असलेला नियोजित कार्यक्रम पक्षांतर्गत गटबाजीमुळे रद्द करावा लागला आहे. यामुळे पहिल्यांदाच भागातील नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आ. अजित पवार यांनी ग्रामीण भाग पिंजून काढण्याचा सपाटा लावला आहे. याचाच एक भाग म्हणून सोनके येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आ. रामराजे ना. निंबाळकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला होता. दि. 28 रोजी हा कार्यक्रम होणार होता. त्यासंबंधीच्या कार्यक्रम पत्रिकाही जिल्ह्यातील नेतेमंडळींना पोहच झाल्या होत्या. मात्र, उत्तर भागातील राष्ट्रवादीच्याच दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांनी त्याच दिवशी साडेपाच वाजता दुसरा कार्यक्रम घेत असल्याच्या कार्यक्रम पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. यामुळे या भागातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
जिल्ह्यातील काहीं नेतेमंडळींनीसुध्दा याची माहिती घेतली असता पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल झाल्याचे कुणालाच सांगण्यात आले नव्हते. अगदी सोनके येथील कार्यक्रमाच्या आयोजकांना सुध्दा त्याची कल्पना नव्हती हे विशेष. या सर्व घडामोडी घडत असताना वरिष्ठ नेते मात्र याबाबत मौन पाळून होते. उत्तर भागात राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाल्याची वस्तुस्थिती आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतही याचे परिणाम दिसून आले. ज्या भागात भाजपला मतदान मिळणार नव्हते तेथे भाजप उमेदवारांनी राष्ट्रवादीबरोबर मते घेतली. सर्वच गावात दोन प्रबळ गट निर्माण झाले आहेत. वरिष्ठ नेते मात्र दोन्ही गटांना आपल्या पध्दतीने हाताळताना दिसतात. कधी पूर्वाश्रमीच्या तर कधी नवीन गटाला ताकद दिली जात आहे.