सातारा : श्रावण संपताच मागील एका महिन्यापासून बंद असलेल्या मांसाहारावर सातारकरांनी चांगलाच ताव मारला. त्यामुळे खवैय्यांची चंगळ झाली. रविवारी शेकडो किलो चिकन-मटणाचा फडशा पडला. खवैय्यांकडून माशांवरही ताव मारण्यात आल्याने चिकन-मटण व मच्छीमार्केटमध्ये लाखोंची उलाढाल झाली.
श्रावणात व्रत-वैकल्यांमुळे अनेक कुटुंबांमध्ये श्रावणात मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे श्रावण संपताच व गणेश आगमनास असलेल्या चार दिवसांच्या वेळेत यथेच्छ मांसाहारावर ताव मारला जातो. यावर्षी श्रावण संपताच रविवार आल्याने अनेकांनी बेत आखून मांसाहारावर ताव मारण्यात आला. मांसाहारी खवैय्यांकडून शेकडो किलो चिकन-मटणाचा फडशा पाडण्यात आला. सातारा शहर व परिसरासह ग्रामीण भागातही मटण व चिकन विक्रेत्यांच्या दुकानांबाहेर नागरिकांची गर्दी कायम होती. अशा खवैय्यांकडून चवीत बदल म्हणून माशांवर ताव मारुन चीभेचे चोचले पुरवण्यात आले. सातारा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश हॉटेल व धाब्यांवर ग्राहकांची वर्दळ वाढली होती. हॉटेल, ढाब्यांवर स्पेशल ऑफरही देण्यात आल्या होत्या.
श्रावण संपताच अनेकांनी मांसाहार यथेच्छ ताव मारला. मांसाहारी जेवणाबरोबर शेकडो लिटर मद्य रिचवण्यात आले. अति मद्यपानामुळे काहींचे भान हरपल्यामुळे माकड चाळ्यांनी अनेकांचे मनोरंजन केले. कोणाला परतीचा रस्ता तर कोणाला स्वत:च्या वाहनांची ओळख पटत नव्हती. उघडीप दिलेल्या पावसानेही हजेरी लावल्याने या गोंधळात आणखीच भर पडली होती. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी मदिरा अन् मद्यपींच्या करामतींच्या चर्चांना उधाण आले होते.