फलटण : निरा देवधरचं बचत होणारे पाणी हे लाभक्षेत्राबाहेर दिले जाणार नाही. या पाण्याची अनेकजण मागणी करत आहेत. तरीही सरकारच्या मूळच्या भूमिकेत कुठेही बदल झाला नाही. मूळच्या लाभार्थींना पाणी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरूच आहे. कृष्णा खोर्यातील पुराचे वाहून जाणारे पाणी आहे. त्यासाठी जागतिक बँकेने 4 हजार कोटी देण्याचे मान्य केले आहे. ते पाणी आपण निरा खोर्यातच आणणार आहोत, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
आ. रामराजे पुढे म्हणाले, निरा देवघरचे वाचलेले पाणी दिसायला लागल्याने लाभक्षेत्राबाहेरीलही अनेक जणांचा या पाण्यावर डोळा आहे आणि ते लोक पाणी मागत आहेत. जो तो आमदार आपल्या भागात पाणी खेचण्याचा प्रयत्न करत असतो. वाचलेल्या चार टीएमसी पाण्यावर मूळ लाभ क्षेत्रातील जनतेचाच अधिकार आहे. आयसीए आणि सीसीए मध्ये फलटण तालुक्यात जो फरक राहिला आहे तो भरून काढण्यासाठी या पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे. त्यातून शिल्लक पाणी राहिले तर ते पाणी निरा खोर्यात वळवून पाणी प्रश्न सोडवण्याची कारवाई आपण करणार का? असा प्रश्न आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी केला.
यावर उत्तर देताना ना. विखे-पाटील म्हणाले, अस्तरीकरण, बंदिस्त पाईप लाईन मुळे पाणी वाचणारच आहे. फलटण तालुक्यातील 22 हजार हेक्टरला पाणी देणारच आहे. यासाठी माजी खासदार रणजीतसिंह व आ. रामराजे असे दोन्ही निंबाळकर यांचा पाठपुरावा सुरू आहे. आम्ही सर्वांनाच न्याय द्यायचा प्रयत्न करतोय. प्रकल्पग्रस्तावर अन्याय करण्याची शासनाची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले.