Rahimatpur Nagar Parishad Election | एकसंध भूमिकेमुळेच रहिमतपुरात परिवर्तन 
सातारा

Rahimatpur Nagar Parishad Election | एकसंध भूमिकेमुळेच रहिमतपुरात परिवर्तन

नीलेश माने पर्वाला प्रारंभ : राष्ट्रवादी-शिवसेनेची युती कायम राहणार का?

पुढारी वृत्तसेवा

प्रकाश गायकवाड

कोरेगाव : रहिमतपूर पालिकेत सत्ताधारी आघाडीचे सुनील माने यांच्यापुढे नीलेश माने यांनी पहिल्या दिवसापासून महायुतीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तनाचा विरोधी पक्षाचा एकमेव अजेंडा म्हणून कडवे आव्हान उभे केले होते. नीलेश मानेंची दूरदृष्टी व अचूक राजकीय रणनीतीने राष्ट्रवादीची गणिते बिघडवली. त्याला भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखी साथ दिल्याने अगदी शेवटच्या निर्णायक क्षणी दैवाने साथ दिली व नगराध्यक्षपदाला गवसणी घालता आली. सुनील माने यांना हा पराभव आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. कार्यकर्त्यांमध्ये नसलेला एकजिनसीपणा, राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी व अँटी इन्कमबन्सीचा फॅक्टर भाजपच्या पथ्यावर पडला. राष्ट्रवादी-शिवसेना युतीला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी त्यांची युती कायम राहणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

मंत्री जयकुमार गोरे, ना. शिवेंद्रराजे भोसले, आ. मनोजदादा घोरपडे यांच्या रहिमतपूरच्या विकासासाठी मिळालेल्या बलाढ्य साथीमुळे भाजपला विजयश्री खेचून आणता आली. मात्र, नगराध्यक्ष भाजपचा व सत्ता राष्ट्रवादीची या समीकरणामुळे पुढील पाचवर्षे सत्ताधारी व विरोधकांसाठी सत्त्वपरीक्षाच ठरणार आहे. या निकालाने आगामी काळात शहरातील विकासाची नवी समीकरणे मांडली जाणार आहेत. रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शिवसेना युतीला पहिल्यापासूनच पोषक वातावरण होते. मात्र, भाजपच्या आ. मनोज घोरपडे यांनी 21 - 0 चा नारा करताच रहिमतपुरच्या आत्तापर्यंतच्या निवडणुकीत पहिल्यांदाच खर्‍या अर्थाने राष्ट्रवादीला तगडी फाईट मिळाली. यानंतरच रहिमतपूरने परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरू केली.

21-0 चा नारा जरी यशस्वी ठरला नसला तरी 9 नगरसेवक व नगराध्यक्षपद मिळवत भाजपने पालिकेवर कब्जा मिळवला. सत्ताधारी राष्ट्रवादी शिवसेनेच्या युतीने भाजपलाही धक्का देत 11 नगरसेवक विजयी केले. या निवडणुकीत मतदारांनी पक्ष न पाहता वैयक्तिक हित व नाते संबधाला प्राधान्य दिल्याचे आकडेवारी सांगते. एकाच प्रभागातील एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांत पडलेली वेगवेगळी मते पाहिल्यानंतर लागलेल्या अनपेक्षित विजयाचे सत्य समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपच्या डिझास्टर मॅनेजमेंटमुळे भाजप वरचढ ठरले व दुसर्‍या फेरीत नगराध्यक्ष पदाची माळ भाजपला मिळाली व 25 वर्षांच्या सत्तेचे परिवर्तनात रूपांतर झाले. सन 1853 सालातील पहिली नगरपरिषद असणार्‍या रहिमतपूरच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून वैशाली नीलेश माने यांना मान मिळाला आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकारणात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी रहिमतपूर नगरपालिका अखेर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली. त्यासोबतच रहिमतपुरात नीलेश माने पर्व सुरु झाले. या विजयामागे केवळ संख्याबळ नव्हे, तर नेतृत्व, दूरदृष्टी आणि अचूक राजकीय रणनीती यांचा परिपक्व संगम दिसून आला. या संपूर्ण सत्ता परिवर्तन घडामोडींचे केंद्रबिंदू ठरले ते मंत्री जयकुमार गोरे व आ. मनोजदादा घोरपडे व भाजपचे जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम. नीलेश माने यांच्या साथीने त्यांनी सातत्यपूर्ण जनसंपर्क, संघटनात्मक ताकद आणि स्पष्ट भूमिका यांच्या जोरावर त्यांनी रहिमतपूर नगरपरिषदेवर भाजपची पकड अधिक भक्कम केली आहे. त्याला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. चित्रलेखा माने यांची मोलाची साथ मिळाली. या विजयामध्ये नीलेश माने यांचे धुरंदर राजकीय कौशल्य निर्णायक ठरले. बदलत्या राजकीय परिस्थितीचे अचूक आकलन, योग्य वेळी घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि कार्यकर्त्यांशी असलेली घट्ट नाळ यामुळे ही लढत भाजपच्या बाजूने वळली. रहिमतपुरात आजपर्यंतच्या राष्ट्रवादीच्या एकतर्फी विजयाला आ. मनोजदादा घोरपडे व सौ. चित्रलेखा माने कदम यांनी सातत्यपूर्ण केलेल्या प्रयत्नांमुळे संघटन पातळीवर मजबूत बांधणी झाली. त्यांच्या मेहनतीचा परिणाम म्हणूनच रहिमतपूर नगरपालिकेवर भाजपने निर्णायक विजय मिळवला.

सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट या महायुतीतील मित्र पक्षात सुरुवातीला एकतर्फी वाटणारी लढत भाजपने नियोजनपूर्वक प्रचार करून अटीतटीची बनवली. राष्ट्रवादी व शिवसेना युतीचे सुनील माने व वासुदेव माने यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री शंभूराजे देसाई, माजी आ. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सलग 25 वर्षात केलेल्या सर्वांगीण विकासाचा आढावा जनतेसमोर मांडला. ना. अजित पवार यांनी त्यांच्या रहिमतपूरच्या सभेत कार्यकर्त्यांमध्ये एकजिनसीपणा आणण्याचा सूचक इशारा दिला होता. मात्र, राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजीमुळे पक्षनिहाय मते न पडल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला. मतमोजणीत त्यांनी शहरात कोट्यवधींच्या केलेल्या विकास कामाला मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट चित्र दिसले.

जनतेने साधला राजकारणातील समतोल

सुनील माने आणि त्यांची टीम काहीशी गाफील राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक प्रभागात दिग्गजांना विजयासाठी करावा लागलेला संघर्ष, काही प्रभागात आलेले अपयश राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरले. रहिमतपूरच्या राजकारणाचा समतोल राखण्यासाठी रहिमतपूरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला 9, शिवसेना 2 व भाजपला 9 सदस्य निवडून देत सभागृहात पुढील पाच वर्षे सत्ताधारी व विरोधकांसाठी सत्त्वपरीक्षा पाहण्याचा जणू काही विडाच उचलल्याचे दिसून येते.

बहुमताअभावी कारभार करताना लागणार कसोटी

नगराध्यक्षपदी निवड झालेल्या वैशाली माने या विजयी झाल्या असल्या तरी बहुमताअभावी त्या पुढील पाच वर्षे कसा कारभार चालवणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या मदतीला त्यांची पती नीलेश माने हे सुद्धा नगरसेवक म्हणून पालिकेत आले असले तरी बहुमत नसल्याने त्यांना विरोधकांना विश्वासात घेऊन विकासाचा राजकीय समतोल साधत रहिमतपूरचा सर्वांगीण विकास साधावा लागणार आहे. रहिमतपूर नगरपालिकेवरील नीलेश माने यांचा विजय जयकुमार गोरे व आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम यांच्या प्रयत्न व पाठिंब्यामुळेच शक्य झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT