Khambatki tunnel Pudhari
सातारा

Khambatki tunnel: नव्या खंबाटकी बोगद्यातून बुंगऽऽ.. बुंगऽऽ.. बुंगाट

ट्रायल बेसवर वाहतूक सुरू : पुणे-सातारा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांचा वाचणार वेळ

पुढारी वृत्तसेवा

वेळे : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याची ट्रायल शनिवारी यशस्वीरीत्या पार पडली. नव्या कोऱ्या करकरीत रस्त्यावरून सुसाट आलेली वाहने बुंगऽऽ..बुंगऽऽ..बुंगाट धावली. पुढील आठ दिवस या बोगद्यातून ट्रायल बेसिसवर हलक्या वाहनांची सुपरफास्ट वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असून, यामुळे सातारा-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोशी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ट्रायल बेसची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

या ट्रायलदरम्यान महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी ए. श्रीवास्तव, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष, भूमिपूत्र व दै. ‌‘पुढारी‌’चे निवासी संपादक हरीश पाटणे, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे सहाय्यक सल्लागार मनोज वाडेकर, रोहन यादव, सत्यजित निंबाळकर, भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि पृथ्वीराज ताटे, खंडाळा पोलिस ठाण्याचे सपोनि शेळके, वाहतूक विभागाचे सपोनि वंजारी यांच्यासह महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व वेळे आणि हरिपूरचे नागरिक उपस्थित होते.

खंबाटकी घाटात सतत होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात लक्षात घेऊन केंद्र सरकारने येथे दोन नवीन बोगद्यांसाठी 926 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, वेळे गावापासून हरिपूर ते खंडाळा दरम्यान 6.3 किलोमीटर लांबीचा नवीन रस्ता विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर दोन स्वतंत्र बोगदे तयार करण्यात येणार असून, त्यापैकी एका बोगद्याची ट्रायल शनिवारी घेण्यात आली. सध्या या महामार्गावरून दररोज सुमारे 55 हजार वाहने प्रवास करतात. गेल्या दोन दशकांत अवजड वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी, वाहन बिघाड आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. जुना एकेरी बोगदा आणि घाट रस्ता अपुरा पडू लागल्याने नव्या बोगद्यांची आवश्यकता निर्माण झाली होती.

या नवीन बोगद्यामुळे साताऱ्याहून पुण्याकडे जाताना लागणारे एस वळण तसेच पुण्याहून साताऱ्याकडे येताना येणारा सुमारे पाच ते सहा किलोमीटरचा घाटमार्ग बायपास होणार आहे. परिणामी वेळे ते खंडाळा हे अंतर पाच ते सात मिनिटांत पूर्ण होणार असून, प्रवाशांचा वेळ व इंधनाची बचत होणार आहे. तसेच वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. ट्रायल कालावधीनंतर उर्वरित अपूर्ण कामे पूर्ण करुन हा नवीन बोगदा कायमस्वरुपी प्रवाशांच्या सेवेसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT