खटाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील ब्रिटिशकालीन नेर धरणातून रब्बी हंगामासाठी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता पाणी सोडण्यात आले आहे. सध्या मुख्य कालवा आणि येरळा नदीपात्रातून पाणी सोडण्यात आले आहे. खातगुण तट भरल्यानंतर उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी प्रवाहित होणार असल्याने शेतकऱ्यांनी त्वरित पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रब्बी हंगामासाठी नेर धरणातून पाणी सोडण्याचे निर्देश ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले होते. पाटबंधारे विभागाने तारेवरची कसरत करून तसे नियोजन केल्यानंतर मंगळवारी धरणातून पाणी सोडले. सध्या नेर मुख्य कालवा आणि नदीपात्रातून पाणी सोडण्यात आले आहे. नदीपात्रातील पाणी खातगुण तटापर्यंत पोहचून पुढे उजव्या आणि डाव्या कालव्यातून प्रवाहित होणार आहे. काटकारवाडी येथे नदीकाठावरील एका विहीरीत पोकलॅन मशिन पडल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र लवकरच खातगुण तट भरून पाणी दोन्ही कालव्याद्वारे पुढे जाणार आहे.
अनेक वेळा आवाहन करूनही नेर धरणाच्या पाण्याची पाणीपट्टी भरण्याला शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आता पाणी सोडले असल्याने शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नेर धरणातील इंच न् इंच पाण्याचा हिशेब पाटबंधारे विभागाला द्यावा लागत असल्याने शेतकऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.