वेलंग : वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पर्यटनाला मोठा वाव आहे. केवळ धोम धरणच नव्हे तर येथील शिवकालीन मंदिरांचा विकास, पौराणिक गोष्टींचे जतन, जिवाजी महाले स्मारक, गायमुख घाट या परिसराचा विकास केल्यास रोजगारात भर पडणार आहे. याकडे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
वाईच्या पश्चिम भागातील धोम येथील शिवकालीन नरसिंह मंदिर हे येथील प्रमुख आकर्षण आहे. त्याचे दगडी बांधकाम, कोरीव नक्षीकाम आणि वास्तुशिल्पीय सौंदर्य हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. पौराणिक दृष्टीने या मंदिराचे पांडवांशी नाते जोडले जाते. नरवीर जिवाजी महाले यांचे जन्मगाव कोंढवली हे याचं भागात आहे.
धोम येथील नरसिंह मंदिरात सुशोभिकरण झाल्यास पर्यटक आकर्षित होवून रोजगार वाढतील. यासाठी नदीपात्रामध्ये वाढलेली जलपर्णी काढणे गरजेचे आहे. या जलपर्णीमुळे सध्या पौराणिक काळातील गायमुख पूर्ण झाकलेले आहे. तसेच जिवाजी महाले यांच्या स्मारकाचाही प्रश्न मागीं लावणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेला रोहिडेश्वर किल्ला असून तेथे जाण्यासाठी असणार्या रस्त्याची चाळण झाली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. निसर्गसंपन्नता, ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक महत्त्व यांचा संगम असलेल्या या भागाचा विकास करण्यासाठी सातार्याचे पालकमंत्री व पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे करण्यात आली आहे.
वाईचा पश्चिम भागात पर्यटनाला वाव आहे. यासाठी पर्यटनमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. शिवसेना वाई विधानसभा प्रमुग विकास शिंदे यांनी या भागात निधी उपलब्ध केला आहे. मात्र, पर्यटन विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करणार आहे.रविंद्र भिलारे, तालुकाध्यक्ष शिवसेना