सातारा : जिल्ह्यातील 11 पंचायत समितींमध्ये सभापती व उपसभापती निवडीमध्ये सोमवारी राजकीय कुरघोड्यांचे राजकारण रंगले. राष्ट्रवादी व भाजपमध्ये या निवडींच्या निमित्ताने टस्सल झाली. भाजपने सातारा, कराड, खटाव, जावली या चार पंचायत समित्यांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले तर फलटणमध्ये भाजपने राजकीय उलथापालथ करत राष्ट्रवादीचेच सदस्य फोडून सभापतिपद पटकावले. त्यामुळे भाजपकडे पाच पंचायत समित्या आल्या. राष्ट्रवादीने वाई, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव, माण या पाच पंचायत समित्यांची सत्ता काबीज केली. शिवसेनेने पाटणमध्ये निर्विवाद सत्ता मिळवली.
भाजपने सातारा, कराड, खटाव, जावली तालुक्यांमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवले. सातारा व जावली पंचायत समितीमध्ये ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे निकटवर्तीय सदस्य सभापती बनले आहेत. साताऱ्यातून कोंडवे गणातील पै. महेश गाडे यांना सभापती मिळाले. तर उपसभापतिपद अतित गणाच्या सुषमा जाधव यांना देण्यात आले. तसेच जावलीमध्ये स्व. आ. लालसिंगराव शिंदे यांचे नातू व कुडाळ गणाचे प्रतिनिधी सौरभ शिंदे हे सभापतिपदी विराजमान झाले, तर उपसभापतिपद खर्शी बारामुरा गणातील गोरख महाडिक यांना देण्यात आले.
कराड दक्षिण मतदारसंघातील विंग गणाच्या नंदाताई यादव यांना सभापती करून भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिणवर आणखी प्रभाव वाढवला आहे. तर उपसभापतिपद हे कराड उत्तर मतदारसंघात खेचून आणण्यात आ. मनोजदादा घोरपडे यांना यश मिळाले. वाघेरी गणाच्या अनिता वेताळ यांना उपसभापतिपदाची संधी मिळाली आहे. खटावमध्येही ना. जयकुमार गोरे आणि आ. महेश शिंदे यांनी सभापती व उपसभापतिपद राखले आहे. या ठिकाणी कातरखटाव गणाच्या वनिता दुबळे या सभापती तर रेश्मा शेडगे या उपसभापती झाल्या.
फलटणमध्ये निवडणूक एकत्र लढलेल्या राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्येच राजकीय आखाडा निर्माण झाला. राष्ट्रवादीच्या चिन्हावर साखरवाडी गणातून निवडून आलेल्या शिवांजली विक्रमसिंह भोसले यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून सभापतिपद मिळवले. या निमित्ताने भाजपने फलटण पंचायत समितीवर वर्चस्व मिळवले असले तरी आमदार पदाप्रमाणेच पंचायत समितीचे सभापतीपद हे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीकडेच राहिले आहे. तर उपसभापतीपदावर शिवसेनेचे अमोल सस्ते यांना संधी मिळाली. सर्वाधिक 8 इतकी सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेला सभापतीपद मिळवता आलेले नाही.
राष्ट्रवादीने वाई, खंडाळा, कोरेगाव, महाबळेश्वर, माण या पाच पंचायत समित्यांवर निर्विवाद झेंडा रोवला आहे. वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघामध्ये ना. मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले तर कोरेगाव, माणमध्ये राष्ट्रवादीची संघटित ताकद भाजपला भारी पडली आहे. वाईमध्ये अभेपुरी गणाचे विक्रांत डोंगरे सभापती तर शेंदूरजणे गणाच्या वर्षा जगताप उपसभापती झाल्या. खंडाळ्यात शिरवळ गणाच्या छायाताई जाधव या सभापती तर नायगाव गणाचे संतोष वीर उपसभापती झाले. कोरेगावमध्ये ना. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, खा. नितीन पाटील यांनी राष्ट्रवादीचा झेंडा रोवत ल्हासुर्णे गणाच्या रुपाली गुरव यांना सभापतीपद तर आर्वी गणाचे रवींद्र पवार यांना उपसभापतीपद दिले. माणमध्ये ईश्वरचिठ्ठीने राष्ट्रवादीला साथ दिली. वरकुटे मलवडी गणाचे विक्रम शिंगाडे सभापती तर मार्डी गणाच्या प्रियांका जगदाळे उपसभापती बनल्या. ना. जयकुमार गोरेंच्या साम्राज्याला माणमध्ये धक्का बसल्याचे चित्र आहे.
महाबळेश्वरात राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गट एकमेकांविरोधात लढला मात्र पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले. येथे मेटगुताड गणातील राष्ट्रवादीच्या शकुंतला चोरमले यांना सभापतीपद तर तळदेव गणातील शिवसेनेचे संजय मोरे यांना उपसभापतीपद देण्यात आले. शिवसेनेला फलटण व पाटणमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी होती. पाटणमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या शिवसेनेने पाटण पंचायत समितीवर आपला झेंडा रोवला. मात्र, फलटण पंचायत समितीमध्ये स्थानिक राजकारणामुळे धनुष्यबाण आणि घड्याळ दोन्ही घायाळ झाले. पाटण पंचायतीत मुरुड गणाच्या सविता पवार यांना सभापतीपद देण्यात आले तर नाडे गणाचे विजय पवार यांना उपसभापतीपद देण्यात आले.