खंडाळा : अनेक गावांत प्रत्येक सणाची, उत्सवाची परंपरा असते. या परंपरेचे वेगळेपण, वैशिष्ट्य गावकरी अगदी मनोभावे जपतात. खंडाळा तालुक्यातील असवली गावातही जानुबाई देवीच्या नवरात्रौत्सवाला अशीच शेकडो वर्षांची अनोखी प्रथा, परपंरा आहे आणि गावकरी ती आजही जपत आहेत. याला उभ्याची नवरात्र म्हटले जाते. विशेष म्हणजे गावातील मुस्लिम समाजातील लोकही देवीचा हा कडक उपवास करतात. त्यामुळेच येथील हिंदू-मुस्लिम समाज एकत्रितपणे आनंदात नांदत आहे.
आसवली हे बारा बलुतेदारांचं गाव आहे. दरवर्षी नवरात्रात येथील भाविक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला नवस करतात. या नवसासाठी कडक उपवास केला जातो. त्यासाठी हे उपासक नवरात्रातीत खाली बसत नाहीत. तर ते काठीच्या आधारे एक पाय वर घेऊन उभेच राहतात. रात्री पाळण्याच्या आधार घेत त्यावर छाती टेकवून उभ्या उभ्या झोपतात. या नऊ दिवसात चप्पल घालत नाही. ही परंपरा साधारण साडे तीनशे वर्ष जुनी आहे.
विशेष म्हणजे उपासक उपवासाला तेल, मीठ, तिखटाचा पूर्णपणे त्याग करतात. त्याऐवजी दिवसातून ठराविक वेळा केवळ गोड पदार्थ खातात. सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास आरती केली जाते. पहाटे पाच वाजता उठून विधीवत पूजाअर्चा उभे राहूनच केली जाते. हातात काठी घेऊन गावभर विविध देवांची आरती करतात.
खाली न बसता एकच पाय जमिनीवर ठेवून नऊ दिवस उभे राहण्याच्या या उपासनेतून असवलीतील गावकर्यांची देवाप्रती असिम श्रद्धा दिसतेच. पण या श्रद्धेबरोबच या भाविकांची सहनशीलताही वाढीस लागते, जी पुढील आयुष्यातील विविध प्रसंग हाताळण्यासाठी फायदेशीर ठरते.
कठोर उपासनेवर गावकर्यांचा विश्वास
गावकरी मानतात की, अशी कठोर उपासना केल्यावर देवी आपल्या मनोकामना पूर्ण करते, अशी श्रद्धा आहे. विशेष म्हणजे या उपासनेत सर्व समाजातील लोक सहभागी होतात. सर्व धर्मीय बांधवही हाच उपवास पाळतात. ‘देव जातीपातीचा नसतो’... असं सांगत तेही नऊ दिवस देवीसमोर उभे राहतात. ही भक्ती, हा त्याग, ही श्रद्धा यासाठी आसवली गावात दरवर्षी हजारो लोकांची गर्दी होते.