वेलंग : पांडे (ता. वाई) या गावात ‘उभ्या’चे नवरात्र ही परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. नवरात्रमध्ये जे लोक नवस बोलतात, ते नवसकरी घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत उभे राहून नवस पूर्ण करतात. या अनोख्या उपवासाने ‘सर्व मनोकामना पूर्ण होतात,’ अशी या गावातील, तसेच परिसरातील लोकांची धारणा आहे. यावर्षीही नऊ दिवस उभे राहून काळभैरवनाचा जागर गावात करण्यात आला.
पुणे- बंगळूर महामार्गापासून चार किलोमीटर अंतरावरील पांडे गावात साडेतीनशे उंबरठा व सुमारे अडीच हजार लोकसंख्या आहे. भैरवनाथ हे ग्रामदैवत आहे. तसेच इतर विविध देवदेवतांची मंदिरे, तसेच मिनारा मशिद आहे. गावात हिंदू-मुस्लिम समाजाबरोबरच इतर सर्व जाती जमातीतील लोक गुण्यागोविंदाने राहतात. नवरात्रात घटस्थापनेपासून नवमीपर्यंत गावातील जवळपास पंच्याहत्तर टक्के लोक कडक उपवास करतात. काळभैरवाला ज्यांनी नवस केला आहे, असे लोक उभ्याचे नवरात्र पाळतात.
या नऊ दिवसांत नवसकर्यांनी पायात पादत्राणे न घालता जमिनीवरच पाय ठेऊन सर्व दिनचर्या उभ्याने करावयाची असते. नवसकर्यांनी गावची शिव ओलांडायची नसते. झोप आल्यास दोरीने टांगलेल्या झोपाळ्यावर छातीपर्यंतचा भाग टेकवून डुलकी घेतात मात्र एक पाय जमिनीवरच ठेवावा लागतो. यासाठी भैरवनाथ व विठ्ठल या मंदिरात झोपाळे बांधण्यात येतात. दुपारच्या वेळी घरी फराळासाठी गेले, तरी फराळ उभ्यानेच करायचा. मात्र, मुक्कामाला मंदिरात यायचे अशी शिस्त आहे. मंदिरात बांधलेल्या झोपाळ्यावरच नवसकरी रात्रीची विश्रांती घेतात. व्रताच्या स्मरणासाठी व आधारासाठी नवसकरी काठीचा आधार घेतात, अशी व्रताची कडक सर्व बंधने आहेत.
फराळात फळे व तिखट-मीठ एकत्र नसलेल्या पदार्थांचा समावेश
शुद्ध प्रतिपदेला सकाळी पहाटे आंघोळ करून गावातील सर्व ग्रामस्थ देवांचे दर्शन घेऊन, भैरवनाथाच्या पालखी समवेत सलग नऊ दिवस गावाला प्रदक्षिणा घालतात. धुपारती केल्यानंतर घटस्थापना करण्यात येते. सर्व देवदेवतांची छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात येते. धुपारतीनंतर अकरा वाजता फराळ घेऊन सर्व जण विश्रांती घेतात. यानंतर ढोल-ताशे व शिंग- नवसकरी व महिला दररोज तुतारीच्या निनादात भैरवनाथाच्या मंदिरात येतात. यानंतर व्रतास सुरुवात होते. फराळात फळे व तिखट-मीठ एकत्र नसलेल्या पदार्थांचा समावेश असतो.