फलटण : डॉ. संपदा मुंडे, ननावरे, आगवणे या कोणत्याच प्रकरणांमध्ये आम्ही त्यांचं नाव घेतलं नाही. त्यांनी भानगडी केल्यामुळे त्यांचं नाव आलं असेल, तर यात आमचा काय दोष? मी त्यांच्यावर कोणतेच आरोप केले नाहीत. मला ते मास्टरमाईंड म्हणतात. मुलीला पत्र लिहायला मी लावलं?, हातावर लिहायला मी लावलं?, मेसेज मीच पाठवले? हे सगळं पुराव्यानिशी सिद्ध करा. नार्को टेस्ट हा स्टंट आहे. ठेकेदारांचा मुद्दा घेऊन मला अडकवण्याचा तुम्ही प्रयत्न केला होता याबद्दल त्यांनी स्वतःचीच नार्को टेस्ट करावी. नार्को टेस्ट तुमची तुम्ही करा. नार्को टेस्टची आमची मागणीच नाही. सत्ता तुमची आहे. मला अटक करा आणि मग माझी नार्को टेस्ट करायला लावा, असे आव्हान विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिले.
माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या सोमवारी झालेल्या जाहीर पत्रकार परिषदेस उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी संजीवराजे नाईक- निंबाळकर उपस्थित होते. आ. रामराजे म्हणाले, मुख्यमंत्र्यांची सभा होऊ नये म्हणून मी प्रयत्न करायचा प्रश्नच येत नाही. कार्यक्रम घेण्याचा त्यांना अधिकार आहे. ननावरे, आगवणे, डॉ. संपदा मुंडे या प्रकरणात मी कोठेही त्यांच्यावर आरोप केले नाहीत.
आगवणे हा त्यांचा कार्यकर्ता. त्यांच्यामध्ये कशाने मतभेद झाले याचं मला काय करायचे. उलट माझ्याविरुद्ध उपोषणाला बसलेले आगवणे उपोषण सोडताना त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला मग याचे तुम्हीच मास्टरमाईंड होता का? आगवणे यांच्या मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वैद्यकीय मदत केली यात माझी काय चूक. डॉ. संपदा मुंडे यांनी ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली त्याचा मास्टरमाईंड मी होतो का? आत्महत्या कशी? का झाली? याचा पोलिस तपास बाहेर येईलच. खरंतर पोलिसांना डायरेक्शन जिल्ह्यातील व्यक्तींकडून जातात. त्याचा मास्टरमाईंड मी आहे का? तसं असेल तर माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकावा. पुरावे द्या. आत्महत्येच्या कारणाचा योग्य तपास व्हावा ही आमची मागणी आहे.
मुलीने पोलिस स्टेशनला दिलेली तक्रार डीवायएसपी राहुल धस यांनी दाबून ठेवली. त्या तक्रारीचा निपटारा केला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. ज्या धसानी केस दाबून ठेवली त्यांना इथं कोणी आणलं? हे धस रात्री एक्स व्यक्तीच्या घरी एफआयआर लिहायला जातात? धसांसाठी स्वतंत्र एसआयटी लावावी. आमच्या इथे इतर कारखान्यावर तक्रारी का झाल्या नाहीत? त्यांच्या कारखान्यावर 277 केसेस झाल्याचा मी आरोप केलाच नाही. त्यांच्या कारखान्यावरील 277 केसेस खऱ्या असतील तर त्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. मग बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. एवढेच नव्हे तर धस यांचे व संबंधित काही व्यक्तींचे सीडीआर तपासावेत. 2019 सालापासूनचे सीडीआर तपासले तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. प्रशासकीय दबावातून सर्वसामान्यांना हैराण केले जाते. दमबाजी, खोट्या केसेस हे चालूच आहे. याविरुद्ध लढणारच. काहीही झालं तरी घराण्याची लोकसेवेची परंपरा सोडणार नाही.
आ. रामराजे म्हणाले, माझ्या वयाची काळजी करायला माझे कुटुंबीय आहेत. आपण आपल्या डोक्याची आणि भ्रमिष्ट बुद्धीची काळजी घ्यावी. आम्ही माजी खासदारांचे नाव घेतले नाही. मात्र चौकशी करा, अशी मागणी सुषमा अंधारे करत आहेत. अनेक केसमध्ये त्यांचं नाव येत आहे. भानगड केल्यामुळेच त्यांचं नाव येत असेल. मी जर कालवा आणला नसता तर फलटण तालुक्यात पाणी आलं नसतं. यांनी आपल्या कारखान्यासाठी बेकायदेशीर पाणी वापर केला होता. सोमवारच्या जाहीर पत्रकार सभेत जे झालं तो केवळ स्टंट होता. या सर्वांना मी शेवटपर्यंत विरोध करणार. ज्या व्यक्तीने माझ्या कुटुंबीयांवर खालच्या स्तराला जाऊन बोललं आहे त्याच्यासोबत कधीही आम्ही एकत्र राहू शकत नाही. मी कोणतेच त्यांच्यावर आरोप केले नाहीत. आरोप करणाऱ्या सुषमा अंधारे यांची त्यांनी माफी मागितली आणि माझ्यावर टीका करतात.
आर. आर. निंबाळकर या नावाविषयी बोलताना आ. रामराजे म्हणाले, कोणाचेही नाव सेव करता येऊ शकते. फलटणमध्ये अशी परिस्थिती झाली आहे की यांनी सांगितले तर एफआयआर दाखल होते. आमच्या तालुक्यातून लांब रहा, दिल्लीत त्यांची चांगली ओळख आहे तिथे जावा, असा सल्लाही त्यांनी रणजितसिंहांना दिला.