कराड : कराड पंचायत समितीत भाजपच्या पहिल्या सभापती पदाचा मान कोणाला मिळणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने आ.डॉ.अतुलबाबा भोसले आणि आ. मनोजदादा घोरपडे हे सभापती, उपसभापतीपदी कोणाची वर्णी लावणार याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान आ.डॉ.भोसले गटाचे 8 सदस्य निवडून आल्याने त्यांना सभातीपद तर आ.घोरपडे यांचे 5 सदस्य निवडून आल्याने त्यांना उपसभापतीपद अशी राजकीय तडजोड होण्याची शक्यता आहे. डॉ. भोसले गटातून विंग गणातून नंदाताई यादव तर शेरे गणातून वर्षा निकम या दोघीपैकी एकीला सभापती पदाची संधी मिळणार आहे. घोरपडे गटाकडून उपसभापती पदासाठी मसूर गणातील संतोष पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
कराड पंचायत समितीचे सभापतीपद यावेळी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून, झालेल्या निवडणुकीत भाजपाने 24 पैकी 13 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. कराड पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपाची निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली आहे. सभापती, उपसभापती पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
कराड तालुका कराड दक्षिण आणि कराड उत्तर अशा दोन विधानसभा मतदारसंघांत विभागला गेला आहे. भाजपाच्या 13 सदस्यांपैकी आ.डॉ.अतुलबाबा भोसले गटाचे 8, तर आ. मनोजदादा घोरपडे गटाचे 5 सदस्य निवडून आल्याने आ. भोसले गटाला सभापती पदाचा मान मिळणार आहे. तर आ. घोरपडे गटाकडे उपसभापती पद राहील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
त्या अनुषंगाने प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे समजते. सभापती पद सर्वसाधान महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. आ.डॉ.भोसले गटाकडे या प्रवर्गाचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये विंग गणातून नंदाताई यादव तर शेरे गणातून वर्षा निकम यांचा समावेश आहे. या दोघींपैकी एकीला सभापती पदाची संधी मिळणार आहे. यामध्ये कोणाची वर्णी लागणार हे लवकरच स्पष्ट होईल. सभापती पदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
आ.घोरपडे गटाचे पाच सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये चरेगाव गणातून धैर्यजा माने, वडोली भिकेश्वर गणातून कोमल यादव, मसूर गणातून संतोष पाटील, वाघेरी गणातून अनिता वेताळ, हजारमाची गणातून प्रियांका पळसे यांचा समावेश आहे. अन्य चार सदस्य महिला असल्याने उपसभापती पदासाठी आ.घोरपडे गटाकडून संतोष पाटील यांची वर्णी लागू शकते. सभापती निवडीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी पुढील आठ दिवसात निवडीचा कार्यक्रम लागेल असे समजते.