Nana Patekar 
सातारा

Nana Patekar Social Work : नानांच्या 'नाम'ची साताऱ्याला जलसंजीवनी

दुष्काळी भागाची सावली हरपल्‍याची भावना : सातारा जिल्‍हावासियांना हूरहूर

पुढारी वृत्तसेवा

सातारा : दुष्काळाच्या झळा, पाणीटंचाईचे संकट आणि शेतीची पाण्यासाठीची परवड या समस्यांवर जलसंधारणातून कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न नाम फाउंडेशनने सातारा जिल्ह्यात सुरू ठेवला आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारातून २०१५ मध्ये सुरू झालेल्या नाम फाउंडेशनने साताऱ्यातील दुष्काळी भागात पाणी अडवणे, जमिनीत मुरवणे, ओढे-नाले पुनरुज्जीवित करणे आणि भूजलपातळी वाढवण्याच्या कामाला गती दिली आहे. पाचवड-पेडगावपासून माण तालुक्यातील पार्कंडी आणि कोयना-दरे परिसरापर्यंत जलसंधारणाच्या कामातून गावांच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे. दुष्काळी भागाची ही सावली आता हरपल्‍याची भावना व्‍यक्‍त होत आहे.

४१ ठिकाणी जलसंधारणाची कामे सातारा जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त आणि दुष्काळी भागात नाम फाउंडेशनने मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे केली आहेत. संस्थेच्या माहितीनुसार, २०२४ मध्ये जिल्ह्यात ४१ ठिकाणी जलसंधारणाची कामे करण्यात आली. या कामांतून तब्बल ११ लाख ५४ हजार घनमीटर गाळ व माती काढण्यात आली. त्याचा लाभ ३५ हजार ९२१ जणांना झाला. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजलसाठा वाढवणे आणि शेतीला पाण्याचा आधार देणे, या उद्देशाने विविध कामे करण्यात आली.

खटाव तालुक्यातील पाचवड आणि पेडगाव येथे काही वर्षांपूर्वी पाणीटंचाई गंभीर होती. शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती, तर उन्हाळ्यात गावकऱ्यांना टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत होते. नाम फाउंडेशनने येथे ओढ्यांचे खोलीकरण, सलग समतल चर आणि खोल सलग समतल चरांची कामे केली. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण वाढले. भूजल पातळीत सुधारणा झाली आणि उन्हाळ्यातही पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत झाली. परिणामी शेतीला आधार मिळाला.

कोयना धरण परिसरातील दरे येथेही नाम फाउंडेशनने जलसंधारणाच्या कामाला हात घातला. 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' या संकल्पनेतून धरणातील गाळ काढून तो शेतजमिनीत वापरण्याचा उपक्रम राबवण्यात आला. धरणातील गाळ कमी करण्याबरोबरच तो शेतजमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

माण तालुक्यातील पार्कंडी येथेही सामाजिक उत्तरदायित्वाच्या निधीच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे सुरू करण्यात आली. सलग समतल चर, खोल सलग समतल चर, ओढा पुनरुज्जीवन आणि पाझर तलावाशी संबंधित कामांचा त्यात समावेश आहे. दुष्काळी पट्ट्यात पावसाचे पाणी अडवून त्याचा भूजलवाढीसाठी उपयोग करण्याच्या दृष्टीने या कामांना महत्त्व आहे.

८५ गावांतील शेतकऱ्यांना मदत

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतजमिनींच्या दुरुस्तीसाठी २०२३ मध्ये तळदेव येथे नाम फाउंडेशनच्या मदतीने उपक्रम राबवण्यात आला. ८५ गावांतील १ हजार ८०० शेतकरी आणि ९०० एकर शेतजमिनीशी संबंधित कामे करण्यात आली. सुमारे २० किलोमीटर नदी-ओढ्यांच्या दुरुस्तीचे कामही करण्यात आले. यावेळी नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT