तासवडे टोलनाका : कोल्हापूरमधील कुरिअर बॉयला मारहाण करून लुटणार्या एका संशयिताकडून महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यातील सहभागी संशयिताचे नाव समोर आले असून त्याला पकडण्यासाठी तीन पोलीस पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यातील संशयिताला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री एसटीतून कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या याप्रकरणी प्रशांत कुंडलिक शिंदे (रा. कोराळे, ता. फलटण, सध्या रा. रंकाळा स्टॅन्ड कोल्हापूर) यास मारहाण करून लुटण्यात आले आहे. पुणे - बंगळूर महामार्गालगत वराडे (ता. कराड) गावच्या हद्दीत श्रावणी हॉटेलनजीक ही घटना घडली आहे. दरोडेखोरांनी 35 हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा 95 लाखांचा ऐवज असलेली बॅग लंपास केली आहे. लुटमार सुरू असतानाच एसटीतील प्रवाशांनी शिंगणापूर (ता. माण, सातारा) येथील राहुल दिनकर शिंगाडे या संशयितास पकडून त्यास पोलिसांच्या हवाली केले होते. या संशयिताला गुरूवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांपुढे हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यास पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन ते चार संशयितांनी कारमधून पोबारा केला आहे. यापैकी एका संशयिताचे नाव स्पष्ट झाले असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुरूवारी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासाबाबत तळबीड पोलिसांना सूचनाही केल्या आहेत. संशयितांच्या शोधासाठी तीन पोलीस पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली असून लवकरच या प्रकरणाचे गूढ उकलण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.