राष्ट्र अवमान कृत्यप्रकरणी नागठाणेची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. Pudhari Photo
सातारा

राष्ट्र अवमान कृत्याच्या निषेधार्थ नागठाणे बंद

संबंधित हायस्कूल बंद करण्याची मागणी : गावात तगडा पोलिस बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

नागठाणे : पुढारी वृत्तसेवा

नागठाणे (ता. सातारा) येथे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका समूहाने देशाभिमानाच्या घोषणा दिल्या नाहीत. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बुधवारी नागठाणे गाव बंद करण्यात आले. यावेळी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी घोषणा न देणार्‍या विद्यार्थ्यांचे हायस्कूल बंद करण्याची जोरदार मागणी केली. गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार होवू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त नागठाणेतील सर्व शाळांनी मोठ्या उत्साहात गावातून प्रभातफेरी काढली. यामध्ये गावातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या. नागठाणे येथील सोसायटीच्या मोठ्या चौकात प्रभात फेरी आल्यानंतर मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. मात्र, एका हायस्कुलच्या मुलांनी या घोषणा दिल्या नाहीत. ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्याथ्यार्र्ंच्या राष्ट्र अवमानकारक कृतीचा निषेध करण्यात येवू लागला. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गेले पाच दिवस वातावरण तणावपूर्ण झाले होते. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटना व युवकांनी बोरगाव पोलीस स्टेशन, ग्रामपंचायतीला निवेदन दिले. त्यानंतर बुधवारी सकाळी सर्व संघटनांनी गाव बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच तातडीच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

या ग्रामसभेसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले. यानंतर उपस्थितांनी संबंधित शाळेवर कारवाई झालीच पाहिजे, शाळा बंद करा अशी मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून डीवायएसपी राजीव नवले, सपोनि रवींद्र तेलतुंबडे, पीएसआय स्मिता पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बोरगाव पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांना दुसर्‍या शाळेत प्रवेश द्या

नागठाणेत असा धार्मिक कट्टरतावाद वाढीस लागणे धोकादायक आहे. त्यामुळे या शाळा बंद करून त्यांना दुसर्‍या शाळा, महाविद्यालयात प्रवेश द्यावा अशी मागणीही जमावाने केली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यावेळी पोलिसांनी व ग्रामपंचायतीने जमावाला शांततेचा आवाहन केले. ग्रामस्थांच्या शाळा बंद करण्याच्या मागणीचा विचार करून कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन सरपंच डॉ. रुपाली बेंद्रे, उपसरपंच अनिल साळुंखे, ग्रामविकास अधिकारी सुरेश लादे यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT