कराड : पक्षचिन्ह आणि जागा वाटपावरून मतभेद झाल्यानंतर भाजपाशी फारकत घेत शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोबत घेत कराड नगरपालिका निवडणुकीत दिग्विजय मिळवला आहे. भाजपाकडून कराडची सत्ता खेचून घेत शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेंद्रसिंह यादव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय झाले आहेत. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला सर्वच्या सर्व जागांवर मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले आहे.
कराड नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागावाटपावरून तसेच नगराध्यक्ष पदावरून तीव्र मतभेद निर्माण झाले होते. त्याचवेळी अशीच परिस्थिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसमध्ये पहावयास मिळत होती. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुती यांच्यात मतभेद निर्माण होऊन शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाने एकत्रित येत यशवंत - लोकशाही आघाडीची स्थापना केली होती. तर भाजपा आणि काँग्रेसने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडी शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेंद्रसिंह यादव यांना पाठिंबा दिला होता. पक्षचिन्ह बाजूला ठेवत यशवंत - लोकशाही आघाडीने स्थानिक पातळीवर सर्व 32 जागांवर उमेदवार उभे केले होते. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांच्यासह यशवंत विकास आघाडीचे सात उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्याचवेळी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीला 13 जागांवर विजय मिळाला असून लोकशाही आघाडी ही सर्वात मोठी आघाडी बनली आहे.
त्याचवेळी सत्ताधारी भाजपला नगराध्यक्ष पद गमवावे लागले असून नगराध्यक्ष पदासह 32 जागांपैकी केवळ दहा जागांवर विजय मिळविता आला आहे. त्याचवेळी ऐनवेळी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासह 15 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र मतदारांनी काँग्रेसला अक्षरश: नाकारले असून काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर पठाण यांना अपक्ष उमेदवार रणजीतनाना पाटील यांच्यापेक्षा खूपच कमी मते मिळाली असून ते चौथ्या स्थानावर फेकले गेले आहेत.
राजेंद्रसिंह यादव यांचा 9735 मतांनी विजय...
कराड नगरपालिका निवडणुकीत 69 हजार मतदारांपैकी 48,824 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. राजेंद्रसिंह यादव यांचे पारडे निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून जड असल्याचे चित्र होते. मतमोजणीनंतर राजेंद्रसिंह यादव यांना 4 ते 5 हजारांचे मताधिक्य मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. कार्यकर्तेही तसे बोलून दाखवत होते. मात्र सर्वांचा अंदाज फोल ठरवत राजेंद्रसिंह यादव यांनी झालेल्या मतदानापैकी 50 टक्के म्हणजे 24 हजार मते मिळवत ऐतिहासिक दिग्विजय मिळवला.