फलटण येथील सभेत ना. देवेंद्र फडणवीस, ना. जयकुमार गोरे, रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी हात उंचावून जनतेला अभिवादन केले. Pudhari Photo
सातारा

Politics Controversy | मुंडे प्रकरणात रणजितसिंहांना टार्गेट करणे न शोभणारे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : चिखलफेक केल्याने फरक पडत नाही

पुढारी वृत्तसेवा

फलटण : फलटण नगरपालिकेच्या निमित्ताने विरोधक काय टीका टिपणी करतात, त्याकडे जनतेने लक्ष देऊ नये. दुर्दैवी डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूचे भांडवल करत रणजितसिंहांना टार्गेट करण्याचे विरोधकांनी केलेले राजकारण योग्य नाही. या आत्महत्या प्रकरणात विधानसभेमध्ये तपासाची सर्व माहिती मी दिली. रणजितसिंहांचा या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध आलेला नाही. या प्रकरणात जे सहभागी होते, त्यांच्याविरोधात पुरावे मिळाले आहेत.

त्यांना कठोर शिक्षा होईल. संपदा मुंडे यांच्या कुटुंबालाही आम्ही मदत करू. मात्र, विरोधकांनी राजकारण कुठल्या थराला न्यायचे, याचा विचार केला पाहिजे. या प्रकरणात रणजितसिंहांना टार्गेट करणे हे न शोभणारे आहे. आताही निवडणुकीच्या निमित्ताने चिखलफेक होईल, पण कुठल्याच चिखलाने कमळाला फरक पडत नाही, चिखलातच कमळ डौलाने उभे राहते. फलटणकरांचा आशीर्वाद भाजप-राष्ट्रवादी युतीला मिळतोच, याचा मला अनुभव आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-राष्ट्रवादी युती उमेदवारांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, नगराध्यक्षपदाचे उमेदवार समेशरसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री राम सातपुते, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे, भाजपचे निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, जिल्हा बँकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, अ‍ॅड. नृसिंह निकम, माजी जि.प. सदस्या जिजामाला ना. निंबाळकर, मनिषा नाईक निंबाळकर, प्रतिभा शिंदे, डी. के. पवार, विश्वासराव भोसले, विनायक नलवडे, दिलीप नेवसे उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमच्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे. फलटणमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी मी आलो आहे. ते नालायक आहेत म्हणून मी मत मागायला आलेलो नाही. मला जनतेची सकारात्मक मते पाहिजेत. तुमचे मत विकासाला द्या. फलटणला आम्ही जिल्ह्य़ातील सगळ्यात आधुनिक शहर बनवू शकतो. समशेरसिहांंसारखा विरोधी पक्षनेता म्हणून ताकदीने काम केलेला उमेदवार नगराध्यक्षपदासाठी फलटणला मिळाला आहे. फलटणकरांनी विकासाला साथ द्यावी. पुढील पाच वर्षामध्ये शहराची काय प्रगती करायची, यासाठी आपण एकत्र आलो आहोत. नगरपालिकेमध्ये आपला नगराध्यक्ष नसेल तर परिवर्तनासाठी दिलेला हा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही.

नगराध्यक्षासहीत संपूर्ण नगरपालिकेची सत्ता ही भाजप-राष्ट्रवादीची ताब्यात देणे गरजेचे आहे. रणजितसिंह याच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघाला हजारो कोटींचा निधी मिळाला आहे. वारकरी भवन, महसूल भवन, प्रशासकीय इमारत, पोलीस स्टेशन, क्वार्टर्स, अतिरिक्त सत्र न्यायालय झाले आता दोन्ही न्यायालयांची एकत्रित इमारत करणार आहे. नाईकबोमवाडीत एमआयडीसीतील उद्योगांसाठी सात ते आठ उद्योजकांशी माझे बोलणे झाले आहे.

आम्ही एमआयडीसी आणल्याशिवाय थांबणार नाही. काही जण म्हणत होते. समशेरसिंह ना. निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटणमधील मोठ्या प्रमाणात लखपती दीदी तयार केल्या जातील. निवडणुकीच्या मतदानावेळी फक्त काळजी घ्या, तुमची काळजी पुढचे पाच वर्षे आम्ही घेवू, अशी सादही ना. फडणवीस यांनी घातली. ना. जयकुमार गोरे म्हणाले, जे 35 वर्षांपासून राज्य करतात त्यांनी फलटण शहरासाठी काय केले हे सांगू शकत नाहीत. केवळ व्यक्तिगत खालच्या पातळीवर जावून टीका करतात. संपदाताईंच्या आडून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जातो.

या प्रकरणामध्ये आम्ही एसआयटीची चौकशीची मागणी केल्याने मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशी लावली. निवडणूक विकासाची आहे. फलटणला सन्मान मिळवून देणयाचे काम रणजितसिंहांंनी केले आहे. सत्ता गेली असल्याने पाण्यातील मासा पाण्याविना तडफडतो, तसे हे महाशय तडफडत आहेत. सत्ता गेली पोलिस ऐकेना, तलाठी ऐकेना असे म्हणत आहेत. आयुष्यभर त्यांनी तेच केले. ही निवडणूक भावनेची नाही तर फलटणच्या विकासाची आहे.

माजी खा. रणजितसिंह ना. निंबाळकर म्हणाले, शहरात काही करायचे ठेवले नाही. बहुतांश रस्त्यांचे 125 कोटींचे टेंडर झाले आहे. मागायचे काय हाच आमच्याकडे प्रश्न आहे? राजेगटाने मल:निस्सारण जमिनीत गाडली. या प्रकल्पासाठी शासनाकडून आलेले 128 कोटी रुपये कुठे गेले? हे कुणालाही माहित नाही. याचा तपास महाराष्ट्र सरकारने करावा. फलटणच्या बाणगंगा नदीत दशरथाच्या अस्थी विसर्जित केल्या गेल्या होत्या. मात्र, रामराजेंच्या काळात शहरातील गटार या नदीत सोडण्यात आली. अमृतमधून नदी सुधार योजना होणे गरजेचे आहे. नीरा देवघरचे पाणी पिण्यासाठी द्यावे, बारामतीच्या धर्तीवर महिला हॉस्पिटल द्यावे, असे ते म्हणाले.

भगवा लहरा देंगे...

फलटण नगरी छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी, छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ आहे. प्रभूरामाची नगरी आहे. या नगरीत तुम्ही डाकूंना निवडून देणार का? फलटणनगरीत ज्यांचे नाव महिला आत्महत्या प्रकरणात येते अशांना निवडून देणार का? ‘तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और बंबू भी लगा देंगे तो धूमधाम से, भगवा लहरा देंगे धूमधाम से.’ विरोधक साडी वाटप करतात. भावांना धोतर कधी वाटणार? असा सवाल ना. गुलाबराव पाटील यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT