सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला दिवाळीच्या चार दिवसांमध्ये कोट्यवधींचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये सातारा विभागही आघाडीवर राहिला आहे. सातारा विभागातील 11 आगारांनी दिवाळीत विशेष वाहतूक करून तब्बल 13 कोटी 45 लाख 10 हजार 700 रुपयांचा महसूल मिळवला आहे. त्यामुळे लालपरीला दिवाळीत लक्ष्मी पावली आहे.
महामंडळाच्या सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव खंडाळा, कोरेगाव, वडूज, दहिवडी, फलटण, मेढा या 11 आगारामार्फत दिवाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर दि. 18 ऑक्टोबरपासून पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. तात्कालीन विभाग नियंत्रक विकास माने, विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी योग्य नियोजन केले होते. महिला सन्मान योजनेमुळे एसटीकडे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा ओढा वाढला आहे. तसेच प्रत्येक आगाराला आलेल्या नवीन बसेसमुळे जास्तीत जास्त प्रत्येक आगाराने प्रवाशी वाहतूकीचे नियोजन केले.
जादा प्रवाशी वाहतूकीमधून दि. 23 रोजी 1 कोटी 67 लाख 41 हजार, दि. 24 रोजी 1 कोटी 67 लाख 38 हजार, दि. 25 रोजी 1 कोटी 61 लाख 75 हजार, दि. 26 रोजी 1 कोटी 61 लाख 19 हजार, दि. 27 रोजी 1 कोटी 80 लाख 58 हजार, दि. 28 रोजी 1 कोटी 67 लाख 88 हजार, दि. 29 रोजी 1 कोटी 55 लाख 98 हजार, दि. 30 रोजी 1 कोटी 64 लाख 45 हजार, दि. 31 रोजी 1 कोटी 74 लाख 87 हजार रुपयांचा महसूल सातारा विभागाला मिळाला आहे.
एसटी महामंडळ हे सातारा जिल्ह्यातील लाखो प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरली आहे. दिवाळीसारख्या गर्दीच्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरापासून दूर राहून सेवा दिली. प्रवाशांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांची निष्ठा यामुळेच एसटीला ही उंची गाठता आली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी, विशेष फेऱ्यांचे आयोजन आणि वेळेवर सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा या उत्पन्नवाढीला हातभार लागला आहे.
काही वर्षापूर्वी तोट्यात असणारी एस. टी. महिला सन्मान योजना व अन्य उपक्रमांमुळे फायद्यात येवू लागली आहे. तिकीट सवलतीत महिलांना लाभ मिळत असल्याने लाडक्या बहिणींचा प्रवास वाढला आहे. यामुळेच उत्पन्नाचा मोठा स्त्रोत महिला ठरल्या आहेत. याचबरोबर दिवाळीच्या चार दिवसांच्या सुट्टीत खासगी बसेसचे दर जास्त असल्याचा फायदाही बससेवेला झाला असल्याचे या उत्पन्नातून दिसून आले आहे. सर्व आगारांचे अधिकारी, कर्मचारी, चालक व वाहक यांच्या समन्वय व मेहनतीमुळे सातारा विभागाची 13 कोटींची दिवाळी झाली.