सातारा : उन्हाळी सुट्टीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता आधिक रुपये मोजावे लागणार आहेत. एसटी महामंडळाने सुट्टीचा हंगाम लक्षात घेता प्रवाशांवर 10 टक्के हंगामी भाडेवाढीसह प्रति तिकिटामागे दोन रुपये असा स्वच्छता अधिभार घेण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार दि. 15 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
राज्य परिवहन प्राधिकरणाने महामंडळाला यात्रा, उन्हाळी सुट्टी आणि सणासुदीच्या दिवसात 30 टक्क्यापर्यंत भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. सन 2026 च्या उन्हाळी हंगामासाठी 10 टक्के प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाडेवाढ 14 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर लागू होणार आहे. उन्हाळी भाडेवाढ ही केवळ दोन महिन्यासाठी असून स्वच्छता अधिभार हा कायमस्वरूपी असणार आहे. 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीसाठी एसटीची भाडेवाढ लागू होणार आहे.
भाडेवाढ केवळ साध्या बसगाड्यांसाठी असेल. भाडेवाढीतून हिरकणी, शयनयान, शिवशाही, जनशिवनेरी, शिवनेरी या गाड्यांसह ई बस गाड्यांना वगळण्यात आले आहे. उन्हाळी हंगामासाठी आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांकडून फरकाची रक्कम प्रवासादरम्यान वसूल करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.
महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलतधारी प्रवाशांना हा अधिभार लागू असणार नाही. आवडेल तेथे प्रवास योजनेंतर्गत चार आणि सात दिवसांचा पास देण्यात येतो. अशा प्रवाशांसाठी 5 रुपये अधिभार असणार आहे. पुणे, मुंबई व अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना आता तिकीटासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.