मुंबई येथे माण तालुक्यातील शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करताना खा. धैर्यशील मोहिते- पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील. Pudhari Photo
सातारा

Dhairyashil Mohite Patil | माणमधील शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवा : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

महसूल मंत्र्यांचे तातडीच्या कार्यवाहीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

सातारा : माण तालुक्यातील शेतकर्‍यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. फार्मर आयडी काढणे बंधनकारक असताना, अनेक शेतकर्‍यांच्या दोन किंवा अधिक गावांमधील जमिनींची माहिती फार्मर आयडीवर नोंदवली जात नसल्याने, पीक नुकसान भरपाई आणि इतर शासकीय लाभांपासून ते वंचित राहत आहेत. ही समस्या तत्काळ सोडवा, अशी मागणी खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन केली.

शेतकर्‍यांच्या जमिनी एकापेक्षा जास्त गावांमध्ये असताना, फार्मर आयडीवर केवळ एका गावातील क्षेत्राची नोंद होत आहे. दुसर्‍या गावातील जमिनीवर पीक नुकसान झाले आणि पंचनामा झाला तरी, फार्मर आयडीवर त्या क्षेत्राची नोंद नसल्याने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळत नाही. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान सहन करूनही शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहेत. याशिवाय, महसूल विभागातील तलाठी आणि कर्मचार्‍यांना स्पष्ट कार्यपद्धतीची माहिती नसणे, तसेच तांत्रिक अडथळ्यांमुळे शेतकर्‍यांना प्रशासनाच्या दारात हेलपाटे घालावे लागत आहेत.

खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी या समस्येच्या निराकरणासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. त्यांनी सुचवले की, शेतकर्‍यांच्या सर्व जमिनींची माहिती फार्मर आयडीवर एकत्र जोडण्याची प्रक्रिया सक्षमपणे राबवावी, पर्यायी कागदपत्रांवरुन नुकसान भरपाई मंजूर करण्याचा तात्पुरता निर्णय घ्यावा आणि महसूल विभागातील सर्व कर्मचार्‍यांना यासंदर्भात स्पष्ट सूचना व प्रशिक्षण द्यावे. या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT