सातारा : माढा लोकसभा क्षेत्रातील सह्याद्री पर्वतरांगांमधील भौगोलिक बदल होत आहेत. त्याचा अभ्यास करुन त्याच्याशी निगडीत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती द्यावी, अशी मागणी खा. धैर्यशील माहिते- पाटील यांनी भारतीय हवामान विभागाच्या महासंचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माढा लोकसभा क्षेत्रातील माण, खटाव, फलटण, सांगोला, माळशीरस, कोरेगाव तालुक्यांमधील भूभाग सह्याद्री पर्वतरांगामध्ये येतो. या भागात पूर्वी भरपूर पाणलोट व वनक्षेत्र होते. परंतु, सध्या या क्षेत्राला दुष्काळ, अवकाळी व पावसाचा लहरीपणा आदी संकटांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भौगोलिक व पर्यावरणीय बदलांबाबत गेल्या 100 वर्षातील पर्जन्यमान, तापमान, मृदा व वनक्षेत्रातील बदलांचा अभ्यास केला आहे का? असेल तर त्याचा अहवाल उपलब्ध करावा.
जलस्त्रोत, जैवविविधतेचा कृषी क्षेत्रावर झालेला परिणाम व त्यांचा वैज्ञानिकदृष्ट्या केलेला अभ्यास, पर्यावरणासमोरील आव्हानांबाबत जलसंरक्षण, वनीकरणासाठी शासनाने राबवलेल्या योजनांची माहिती द्यावी. या भागाच्या विकासासाठी ध्येय धोरणे ठरवण्यासाठी ही माहिती आवश्यक असल्यामुळे ती उपलब्ध करावी, अशी मागणी खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भारतीय हवामान विभागाच्या महासंचालकांशी चर्चेदरम्यान केली.