छ.संभाजीनगर : माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना शहरात घडली आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अवघ्या काही तासांच्या नवजात बाळाला एका निर्दयी मातेने गोणीत भरून रस्त्यावर फेकले. मात्र, एका तरुणाच्या सतर्कतेमुळे बाळाचे प्राण वाचले. पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या निर्दयी मातेचा शोध घेऊन तिला अटक केली आहे.
ही घटना गुरुवारी पहाटे पुंडलिकनगर रस्त्यावर उघडकीस आली. आरोपी महिलेने ( वय 24) घरातच बाळाला जन्म दिला आणि तासाभरातच त्याला गोणीत भरून रस्त्याच्या दुभाजकात फेकले. कुत्र्यांनी ही गोणी रस्त्यावर ओढल्यानंतर एका तरुणाला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्याने तत्काळ बाळाला घाटी रुग्णालयात दाखल केले, ज्यामुळे बाळावर वेळेवर उपचार सुरू होऊ शकले. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी महिलेच्या विशिष्ट चपलेवरून तिचा माग काढण्यात आला. या अनोख्या क्लृप्तीमुळे पोलिसांनी काही तासांतच आरोपी महिलेला शोधून अटक केली. सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी पोलिस आरोपी महिलेच्या प्रियकराचाही शोध घेत आहेत.