सातारा : कारंडवाडी (ता. सातारा) येथे माय-लेकीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची थरकाप उडवणारी घटना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घडली. आठ वर्षांच्या मुलाने गळ्यातील फास सोडवून पलायन केल्याने तो बचावला. पतीच्या सततच्या दारू पिण्यामुळे व आर्थिक विंवचना यामुळे ही घटना घडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान, दारूड्या पतीला अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सौ. सविता गणेश मुंडे (वय 33, सध्या रा. कारंडवाडी, मूळ रा. तांदुळवाडी, ता. कोरेगाव) व तिच्या 14 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. आठ वर्षांचा चिमुरडा मात्र बचावला. पती गणेश ज्ञानदेव मुंडे (वय 37) याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंडे कुटुंबीय मूळचे कोरेगाव तालुक्यातील तांदुळवाडी गावचे आहे. सातार्यात एमआयडीसी येथे मोलमजुरी करून या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. गणेश हा दारू पिऊन करून पत्नी सविता, मुलगा व मुलीला मारहाण करत होता. वारंवार पतीचा त्रास व आर्थिक संकट या त्रासाला कंटाळून पत्नी सविता यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. याबाबत तिने मुलीलाही सांगितल्याचे पोलिस सूत्रांनी म्हटले आहे. सविता व मुलीने घरातील फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यावेळी आठ वर्षांच्या चिमुरड्यानेही गळ्यात फास अडकवला होता. मात्र, आई व बहिणीची तडफड पाहून त्याने गळ्यातील फास सोडवला व भेदरलेल्या अवस्थेत घराबाहेर आला. त्याने घराबाहेर असणार्यांना आईने व दीदीने गळफास घेतला असल्याचे सांगितले. याबाबत सातारा तालुका पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करत संशयित आरोपी गणेश यास पोलिसांनी ताब्यात घेतले. गणेश याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास सातारा तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे करीत आहेत.