साखरवाडी : साखरवाडी, ता. फलटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांकडून वैद्यकीय अधिकार्यांनी 1 ते 3 हजार रूपये घेतल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून याप्रकरणी सबंधित वैद्यकीय अधिकार्यावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, दि. 11 रोजी 40 महिला या शस्त्रक्रियेसाठी आल्या असता त्यांच्याकडून हे पैसे उकळल्याच्या तक्रारी आहेत.
महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्यावतीने शासकीय रुग्णालयांमध्ये गोर गरीब रूग्णांना विविध उपचार, गोळ्या, औषधे व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. त्यानुसार कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. अधिकाधिक नागरिकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या शासकीय रुग्णालयात कराव्यात, यासाठी शासन गाव पातळीवर विशेष प्रयत्नशील असते. प्रत्येक गावामध्ये असणार्या आशासेविका या गावांमध्ये दोन व अधिक अपत्य असणार्या कुटुंबीयांचा सर्व्हे करतात. लोकांची माहिती घेऊन त्यांना शासकीय रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे फायदे समजावून सांगतात. त्याचाच परिपाक म्हणून सर्वसामान्य व सधन कुटुंबातील महिलांचा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आयोजित कॅम्पमधून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी कल वाढलेला आहे.
साखरवाडी आरोग्य केंद्रात रविवारी अशा शस्त्रक्रियांसाठी कॅम्प आयोजित केला होता. यावेळी फलटण तालुक्यातील विविध गावांमधून 40 हुन अधिक महिला शस्त्रक्रियेसाठी आल्या होत्या. या महिलांमध्ये ज्यांची सिझर पद्धतीने प्रसुती झाली आहे अशा महिलांकडून प्रत्येक सिझरसाठी 1 हजार या दरानुसार दोन प्रसुती सिझर झालेल्यांकडून 2 हजार व तीन प्रसुती सिझर झालेल्या महिलांकडून 3 हजार रुपये घेतल्याचा आरोप संबंधित महिलांनी केला आहे.
वैद्यकीय अधिकारी अनिल कदम यांनी या शस्त्रक्रिया केल्या. ते स्वत: पैसे न स्वीकारता आशा सेविकांना पैसे द्यावे लागतील, असे सांगत होते. शस्त्रक्रियेनंतर हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. महिला रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जर आशा सेविकांकडे पैसे दिले तरच त्या महिलांना भुलीचे इंजेक्शन दिले जात होते. अन्यथा अशा महिलांना ऑपरेशनसाठी वेळ प्रसंगी टेबलवरून खाली उतरवले जात असल्याचाही आरोप महिलांनी केला आहे. तसेच या पैशाची पावती मागितली असता ती दिली जात नसल्याचेही महिलांनी सांगितले.
शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक लोकोपयोगी निर्णय घेत आहे. मात्र अशा अधिकार्यांकडून गोरगरिबांचे जर शोषण करून अडवणूक होत असेल तर गोरगरिबांनी न्याय कुठे मागायचा? असा सवाल केला जात आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्यांचे शोषण होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकार्यावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अनिल कदम या वैद्यकीय अधिकार्याची कर्मचार्यांमध्ये प्रचंड दहशत आहे. अशा शस्त्रक्रिया करणारे ते जिल्ह्यात एकमेव अधिकारी असल्याने प्रशासनाला त्यांचीच गरज आहे, असे त्यांच्याकडून सांगितले जाते. त्यामुळेच त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी या शस्त्रक्रियेचा कॅम्प असतो तेथील आरोग्य केंद्रातील कर्मचारीसुद्धा या अधिकार्यापुढे अक्षरशः हतबल आहेत. एवढी अरेरावी कदम याच्याकडून होत असल्याने त्याच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? अशी चर्चा होवू लागली आहे.