Shambhuraj Desai 
सातारा

Shambhuraj Desai | माजी सैनिकांसाठी सातारा, पंढरपुरात अद्ययावत संकुल : ना. शंभूराज देसाई

मुंबईत कामाच्‍या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राज्‍यपालांच्‍या निर्देशानुसार सातारा आणि पंढरपूर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच माजी सैनिक कल्याण विभागाच्या जागांचा एकात्मिक विकास प्रकल्प गतिमान करण्यात येणार असून, या ठिकाणी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त अद्ययावत संकुल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्‍पाला गती देण्‍यात आली आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी सातारा व पंढरपूर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि माजी सैनिक कल्याण विभागाकडील जागेच्या एकत्रित विकासासंदर्भात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, माजी सैनिक कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव संतोष कुमार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, उपसचिव विजय पोवार उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे माजी सैनिक कल्याण (पुणे विभाग) संचालक, सातारा जिल्हाधिकारी, सोलापूर निवासी जिल्हाधिकारी, पंढरपूर देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा व सोलापूर जिल्हा माजी सैनिक कल्याण अधिकारी तसेच संबंधित क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले.

सातारा येथे उभारण्यात येणाऱ्या संकुलाच्या माध्यमातून वीरपत्नी तसेच माजी सैनिकांच्या पत्नींनी स्थापन केलेल्या बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्याद्वारे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.

सातारा व पंढरपूर येथील संबंधित जागांची सद्यस्थिती, जागांची तपासणी, उपलब्ध पायाभूत सुविधांचा आढावा तसेच दोन्ही विभागांच्या जागांच्या एकात्मिक विकास आराखड्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्‍यात आली. हा उपक्रम माजी सैनिकांच्या कल्याणाचा नवा आदर्श निर्माण करणारा राज्यातील पहिलाच एकात्मिक विकास प्रकल्प साकारला जाणार आहे, असे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

या विकास प्रकल्पामध्ये पर्यटन विकासाबरोबरच माजी सैनिकांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन, विभागांमधील प्रभावी समन्वय आणि वेळबद्ध कार्यवाही सुनिश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT