स्व. तात्यासाहेब कोरे यांना मरणोत्तर जाहीर झालेला श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार आ. रामराजे यांच्या हस्ते स्वीकारताना आ. विनय कोरे.  Pudhari Photo
सातारा

Satara News | आ. रामराजे हे पाणी प्रश्नातील अभ्यासू नेतृत्व : आ. विनय कोरे

निंबाळकर घराण्याचे स्वराज्यासाठी योगदान

पुढारी वृत्तसेवा

फलटण : 1200 वर्षांचा इतिहास असणार्‍या नाईक निंबाळकर घराण्याने स्वराज्यासाठी योगदान दिले आहे. या घराण्यातील अनेक पिढ्या लोककल्याणासाठी कार्यरत होत्या. तोच वारसा मालोजीराजांच्या पुढील काळात आ. रामराजे व त्यांचे बंधू पुढे घेऊन जाताना दिसत आहेत.

आ. रामराजेंनी पाण्यासाठी संघर्ष केल्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी फलटण येथे कृष्णा खोरे महामंडळाची घोषणा केली. पाणी प्रश्नी अभ्यासू नेतृत्व म्हणून ते सुपरिचित असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. विनय कोरे यांनी केले.

फलटण येथे स्व. तात्यासाहेब कोरे यांना मरणोत्तर श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी आ. रामराजे ना. निंबाळकर, पिंपरी चिंचवड सहकारी बँकेचे अध्यक्ष शिरीष देशपांडे, माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जि. प. चे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, अनिकेतराजे ना. निंबाळकर, विश्वजितराजे ना. निंबाळकर, विश्वासराव देशमुख उपस्थित होते.

आ. विनय कोरे म्हणाले, पाणी प्रश्नी आमदार रामराजे यांची तळमळ, त्यांनी पाण्यासाठी केलेला संघर्ष मी जवळून पाहिला आहे. रामराजे पुनर्वसन मंत्री असताना त्यांच्याच प्रयत्नामुळे माझ्या मतदारसंघात रेंगाळलेला धरणाचा प्रश्न मार्गी लागला. स्त्री समतेचा निर्णय मालोजीराजे यांनी आपल्या संस्थानांमध्ये सर्वात प्रथम घेतला होता. शाहू महाराज व मालोजीराजे यांच्या सामाजिक कार्यामध्ये खूप साम्य आहे. नाईक निंबाळकर घराण्याचा सामाजिक कार्याचा वारसा राजेबंधू त्याच तडफेने पुढे नेत आहेत.

आ. रामराजे म्हणाले, स्व. तात्यासाहेब कोरे यांचे संस्कार व विचार मालोजीराजे यांच्या विचारांमध्ये साम्य स्थळ जाणवते. वारणा खोर्‍यात सहकार रुजवून शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक क्रांती घडवणार्‍या स्व. तात्यासाहेब कोरे यांना श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली वाहिल्याचे आज समाधान मिळत आहे. स्व. तात्यासाहेब कोरे यांच्या कार्याची माहिती पुस्तक रूपाने संपूर्ण महाराष्ट्रासमोर आली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक संजीवराजे ना. निंबाळकर यांनी केले. आभार प्रा. प्रभाकर पवार यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT