सातारा : नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये समविचारी पक्षांच्या नेत्यांसोबतच भाजपच्या नाराजांना आम्ही संधी देणार आहोत. सत्तेत जाण्यासाठी अनेकांनी पक्ष सोडला. त्यांची जागा भरण्याचे काम आम्ही करत आहोत. जिथे गर्दी झाली आहे, तेथील नाराज मंडळी आमच्यासोबत यायला तयार आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी केला. साताऱ्यात भाजपविरोधात आमचे पूर्ण पॅनल असेल. या निवडणुकीत जनताच भाजपा विरोधात दंड थोपटेल, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी भवनात जिल्ह्यातील नगरपालिकांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी झाल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. आ. शिंदे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी आम्ही समविचारी पक्षांची मोट बांधली आहे. काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेलाही सोबत घेऊन भाजपला रोखू. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह समविचारी पक्षांच्या नेत्यांसोबत 15 नोव्हेंबर रोजी बैठक होईल. त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
सातारा, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, फलटण येथील नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती आज घेतल्या. सर्वच ठिकाणी सामान्य कार्यकर्ता निवडणुकीला उभे राहण्यासाठी तयारी दाखवतो आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे या चारही पक्षांकडे उमेदवारी मागणीचा ओघ आहे. मराठा समाजाच्या लोकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. निवडणुकीचा निकाल काय लागेल यापेक्षा निवडणूक लढणे गरजेचे आहे. आठ ते नऊ वर्षांनंतर लागलेली ही निवडणूक कार्यकर्ते घडवण्यासाठी महत्त्वाची आहे.
सर्वच ठिकाणी राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, काँग्रेस यांच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एकमत करण्यासाठी दि. 15 तारखेला मित्र पक्षांची बैठक घेतली जाईल. त्यानंतर दि. 16 नोव्हेंबरला आम्ही निवडणुकीत ताकदीने उतरणार आहोत, असेही आ. शिंदे म्हणाले.