Ramraje Naik Nimbalkar | बलकवडी बोगद्यापासून गावापर्यंत या, पाणी कुणी आणलं ते बघाच Pudhari Photo
सातारा

Ramraje Naik Nimbalkar | बलकवडी बोगद्यापासून गावापर्यंत या, पाणी कुणी आणलं ते बघाच

आ. रामराजेंचे तरुणांना मोटरसायकलवरुन पाहणी करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

वाखरी : आता आमचे विरोधक पाण्यासाठी टाहो फोडतात पण खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांना पाणी मिळावे व शेतकरी, शेतमजूर सुखी व्हावा म्हणून धोम-बलकवडी धरणाची संकल्पना मनात धरून निरा- देवधर व धोम बलकवडी धरणाची मी निर्मिती केली. माझं तरूण पिढीला एकच म्हणणं आहे मोबाईल नंतर बघा, वेळात वेळ काढा.

मोटारसायकलवर जावा, देवधर-बलकवडीच्या बोगद्यापासून तुमच्या गावापर्यंत या व पाणी कुणी आणलं ते ठरवा, असे आवाहन करत विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना ललकारले.

वाखरी (ता फलटण ) येथे श्री भैरवनाथ मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नवनाथ ढेकळे उर्फ नवा पाटील यांनी राजे गटात प्रवेश केला. व्यासपीठावर माजी आमदार दिपक चव्हाण, माजी सभापती मोहन लोखंडे, सरपंच अंकुश लोखंडे, शंकरराव माडकर, श्रीरंग चव्हाण, महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे, युवा नेते रणजित तांबे उपस्थित होते.

आ. रामराजे पुढे म्हणाले, फलटण तालुक्याची आम्ही चांगली बसवलेली राजकीय घडी दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. वेळीच आपण सावध होऊन पुन्हा एकदा नव्याने फलटण तालुका आपणास उभा करावयाचा आहे. यासाठी जो काही राजकीय संघर्ष करावा लागेल त्यासाठी मी तयार आहे. कारण फलटणच्या भवितव्यासाठी आम्ही मंडळीने त्याग करून पाणी, उद्योगधंदे, शिक्षण व्यवस्था, रोजगार निर्मितीसाठी कमिन्ससारख्या कंपन्या फलटणला आणल्या. पण फलटण तालुक्यातील आमचे विरोधक लोकांना भुलथापा मारून येथील चांगली संस्कृती नष्ट करू पाहत आहेत.

मी आपला भाग पाण्याच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम केला. त्यावेळी 1700 कोटी रुपये कर्ज रोख्यातून उभे केले म्हणूनच धरणासारखे जटील प्रश्न सोडविता आले. आपण मंडळींनी मी फलटण तालुक्यात आणलेल्या पाण्याचे उतराई होण्यासाठी मला आपले योगदान हवे आहे. म्हणूनच वाखरी येथील नवनाथ ढेकळे यांच्यापासून नवीन राजकारणाला वाखरी येथून सुरवात करूया, असे आवाहनही आ. रामराजे यांनी केले.

प्रारंभी किरण, शामराव व नवा पाटील यांनी श्रीमंत रामराजे यांना फेटा बांधून शाल व श्रीफळ पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले. दरम्यान राजेगटात ढेकळे कुंटूबिय व नवनाथ ढेकळे यांनी जाहीर प्रवेश केल्यामुळे आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे पुष्पहार देऊन स्वागत केले. मोहिते यांनी सुत्रसंचलन केले. आ. रामराजेंच्या सत्कारप्रसंगी नवनाथ ढेकळे उर्फ नवा पाटील, मोहन लोखंडे, अंकुश लोखंडे व इतर.

दमबाजी करणार्‍यांचा समाचार घेवू...

फलटण तालुक्यात आम्ही विकासाची कामे केली पण आता विरोधक आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेऊन मंजूर कामाचे श्रीफळ वाढवत आहेत. जी काही मंडळी आमच्या कार्यकर्त्यांंना दमबाजी करतील त्यांचा आम्ही समाचार घेऊ, हे निश्चित आहे. आपणास आता थांबायचे नाही. संघर्ष करूनच गेलेले गतवैभव पुन्हा मिळवूया, असेही आ. रामराजे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT