फलटण : कोल्हापूरच्या सर्किट बेंचच्या लढ्याचा 30 वर्षापासूनचा मी साक्षीदार आहे. हा लढा मी जवळून बघितला आहे. सर्किट बेंचच्या माध्यमातून न्याय अधिकाराचे विकेंद्रीकरण झाले आहे. आता संभाजीनगरप्रमाणे कोल्हापूरलाही सर्किट बेंच सुरू होत आहे. यामुळे वकिलांचा फायदा होणार आहे. त्याहीपेक्षा सर्वसामान्य जनतेला हायकोर्टात पोहोचणे सोपे होणार आहे. सर्वसामान्यांचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या स्थापनेस परवानगी मिळाल्यानंतर याबाबत आ. रामराजे ना. निंबाळकर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, कोल्हापूरला सर्किट बेंच स्थापनेस परवानगी दिल्याबद्दल मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे जनतेच्यावतीने मी अभिनंदन करतो. कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे म्हणून दीर्घकाळ लढत सुरू आहे. या लढ्याचा तीस वर्षांपासून मी साक्षीदार आहे. हा लढा मी जवळून पाहिला आहे. कायद्याचा माझा जवळून संबंध आहे. मी दोन-तीन वर्ष कायदा पुण्याच्या बार कॉन्सीलमध्ये शिकलो आहे. कायद्याचा प्रोफेसर म्हणूनही मी फलटणमध्ये काम केले आहे.
सुनावणीसाठी मुंबई हायकोर्टात जाणार्या कोल्हापूर, सातारकर येथील लोकांचे हाल मी जवळून पाहिले आहे. मुंबईसारख्या शहरात खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या गैरसोयी तसेच वकिलांच्या फीसाठी त्यांच्या होणार्या हालअपेष्टांना मी स्वतः डोळ्यांनी बघितल्या आहेत. भारतीय कायद्याचा इतिहास हा विषय मी सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये शिकवला आहे. खरंतर सर्किट बेंच ही कल्पना अगदी ब्रिटिश काळापासून आहे. सर्किट बेंच म्हणजे न्याय अधिकाराचं विकेंद्रीकरण असल्याचे आ. रामराजे म्हणाले.
महाराष्ट्राच्या इतिहासातील चांगली घटना
कोल्हापूरच्या सर्किट बेंचमुळे वकिलांचा फायदा होणार आहे. त्यापेक्षाही सर्वसामान्य जनतेला हाय कोर्टात पोहोचणे सोपे होणार आहे. त्यांच्या हालअपेष्टा कमी होणार आहेत. पक्षकारांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे. कोल्हापूर सर्किट बेंचला मिळालेली मान्यता ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत चांगली घटना असल्याचे आ. रामराजे यांनी सांगितले.