सातारा

Ramraje Naik Nimbalkar | तुमच्यासाठी तुरुंगात जाऊ, तुम्ही मागे हटू नका : आ. रामराजेंचे आवाहन

मेळाव्याला गर्दी होते मग सीट का पडते?

पुढारी वृत्तसेवा

फलटण : निवडणूक आता आमची राहिलेली नसून कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अस्तित्वाची आणि शांततेने जगण्याची लढाई बनली आहे. आज कार्यकर्ता म्हणून तुम्हाला त्रास होतोय, उद्या नागरिक म्हणून हा त्रास भोगावा लागणार आहे. मला आता वाद घालणारा गावपातळीवरील पोलिस चौकीला न घाबरणारा कार्यकर्ता अपेक्षित आहे. तुमच्यासाठी वाटेल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही तुमच्यासाठी तुरुंगात पण जाऊ परंतु, तुम्ही मागे हटता कामा नये, असे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी केले.

फलटणमधील अनंत मंगल कार्यालयात आयोजित राजे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी जि.प. अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, बाजार समिती सभापती रघुनाथराजे ना. निंबाळकर, विश्वजीतराजे ना. निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. रामराजे म्हणाले, निवडणुका झाल्या. आपण हरलो. जे जायचे होते ते गेले, उरलेले शिल्लक राहिले. मेळाव्याला एवढी लोकं गोळा होतात मग सीट का पडते? याचे उत्तर हे कार्यकर्ते आहेत. त्यांनी काम केले नाही. आपल्याबाबत जनतेत राग नाही मग कार्यकर्त्यांमुळे असे होत आहे का? निवडणुकीच्या दोन दिवस आधी प्रतिस्पर्ध्यांकडून पैसे वाटले जात असताना कार्यकर्ते गप्प का बसले? तुमच्या गावात रात्रीच्या पैशाच्या गाड्या फिरत होत्या मग तुम्ही काय करत होता? बायकांबरोबर टीव्ही बघत बसला. पाय रोवून जर तुम्ही बाहेर पडला असता तर पैसे वाटनं थांबलं असतं. तुम्ही जर घाबरून घरी बसणार असाल तर आम्हाला लढाई करायची आहे पण सैन्यच पळपुटे निघाले तर काय उपयोग?, अशा शब्दात रामराजेंनी कार्यकर्त्यांना फटकारले.

फलटण तालुक्यात 2019 पासून वेगळेच राजकारण सुरू झाले आहे. कॉन्ट्रॅक्टर असाल तर तुमची बिलं अडवतो, टेंडर मागू नको, बघून घेतो अशी भाषा वापरली जात आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर दीड दीड कोटींचे दंड लावायचे, पोलिसांमार्फत दमदाटी करायची, खोट्या केसेस लावायचे, हे सगळे आपण भोगलेले आहे. आम्ही सत्तेचा गैरवापर करून कधीही विरोधकांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला नाही कारण ते आमचे संस्कार नाहीत.

जे सोडून गेले त्यांच्याबद्दल मला फारसे बोलायचे नाही, गेले ते मेले. संध्याकाळी यादी काढा, एक सणसणीत आंघोळ करा आणि ओम शांती म्हणा. धरणंच झाले नसते तर पाईपलाईन टाकली असती का? तरुण पिढीने दुष्काळ पाहिला नाही ते आता कालव्यात बुड्या मारत आहेत. त्यांना काय आठवण असणार? श्रीराम कारखाना वाचवला नसता तर काय झाले असते? असा खडा सवालही आ. रामराजे यांनी केला.

800 वर्षापूर्वी होतो अन्‌‍ 800 वर्षानंतरही राहणार : विश्वजीतराजे

आमचा सुसंस्कृतपणा आम्हाला नडला. काही चाड्या सांगणाऱ्या लोकांमुळे राजेगटाचे नुकसान झाले. माणसे पारखून कामकाज केले असते तर आज ही वेळ आली नसती. राजे गटाची ताकद संपलेली नाही. 800 वर्षापूर्वी होतो आणि 800 वर्षानंतरही असणार आहोत. इथे बसलेल्यांचे पूर्वज तेव्हाही होते व पुढेही असणार आहेत. तुमची भाषा सांभाळा, तुम्ही म्हातारे झाल्यावर तुमची गाठ आमच्याशीच आहे, असा इशारा माजी पंचायत समिती सभापती विश्वजीतराजे ना. निंबाळकर यांनी विरोधकांना दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT