श्रीराम साखर कारखान्याच्या सभेत बोलताना आ. रामराजे ना. निंबाळकर, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर. Pudhari Photo
सातारा

Ramraje Nimbalkar: आ. रामराजेंची साद; विश्वासरावांचा प्रतिसाद

‘श्रीराम’ सभासदत्वाबाबतची पिटिशन मागे घेण्यास सकारात्मकता

पुढारी वृत्तसेवा

फलटण : मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व देण्याबाबत कारखान्याचे सभासद विश्वासराव भोसले यांनी न्यायालयात पिटिशन दाखल केले आहे, ते त्यांनी माघारी घ्यावे, अशी विनंती सभासदांच्या वतीने आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी केली. त्यावर विश्वासराव भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महाराजसाहेबांचा नेहमीच आम्हाला आदर आहे. महाराजसाहेबांच्या या निर्णयाबरोबर मी आहे, असे श्रीराम कारखान्याच्या वार्षिक सभेत सांगितल्याने कारखान्याच्या निवडणुकीबाबत न्यायालयात सुरू असलेली मयत वारसांच्या सभासदत्वाबाबत न्यायालयीन लढाई संपून कारखान्याची निवडणूक लवकरच लागण्याचे संकेत मिळत आहेत.

श्रीराम कारखाना कार्यस्थळावर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. सभेस आ. रामराजे ना. निंबाळकर, संजीवराजे ना. निंबाळकर, कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, व्हाईस चेअरमन संतोष खटके व सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.

मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व देण्याच्या मुद्द्यावरून वार्षिक सभा थोडीशी वादळी ठरली. याबाबत आ. रामराजे यांनी कारखान्याची निवडणूक माजी सनदी अधिकारी विश्वास भोसले यांनी मयत सभासद वारसांच्या सभासदत्वाच्या मुद्द्यावर जे पिटिशन न्यायालयात दाखल केले आहे ते पिटिशन त्यांनी मागे घेतल्यास निवडणुकीतील अडथळ्याची शर्यत थांबेल.

कारखान्याच्या आज वरच्या कामाचा आढावा घेताना रामराजे म्हणाले, कारखाना लिलावात काढण्याबाबतचा सल्ला कै. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी दिला होता. कारखाना अडचणीत होता तरीही आम्ही कारखाना सभासदांच्या मालकीचाच रहावा यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यात यशस्वी झालो. आता कारखाना सुस्थितीत आल्यावर सगळ्यांच्या नजरा इकडे वळल्या आहेत. त्यावेळी हे लोक होते कुठे? विरोध करणारे काँग्रेसमध्ये होते. कारखान्याच्या हितासाठी भोसले यांनी पिटीशन मागे घ्यावे, अशी आ. रामराजे यांनी भोसले यांना विनंती करून सर्व सभासदांच्यावतीने तसा ठराव मांडला. भोसले यांनीही खिलाडू वृत्ती दाखवतात सभासद हितासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.

मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व देण्यावरून संजीवराजे व विश्वासराव भोसले यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. आपली भूमिका स्पष्ट करताना संजीवराजे म्हणाले, कारखान्यामध्ये नियमाप्रमाणेच काम सुरू आहे. मयत वारस नोंदीबाबत कारखान्याने कोणाचीही अडवणूक केलेली नाही. सभासद वारसांनी माहिती द्यावी तातडीने त्यांच्या वारस नोंदी करून दिल्या जातील. मयत सभासदांचे मतदार यादीतून नाव कमी झाले असले तरी भाग भांडवलाच्या यादीतून त्यांचे नाव कमी होत नाही. कारखान्याची निवडणूक लवकर व्हावी ही आमची इच्छा आहे. निकाल शेवटी सभासद देणार आहेत, कोणाला निवडायचं ते सभासद ठरवत असतात. सभासदच निकाल देणार असतील तर निवडणुका लवकर व्हाव्यात, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT