लोणंद : खंडाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे. इच्छुकांची संख्या जरी वाढली असली तरी उमेदवारी एकालाच मिळणार आहे. विरोधक आपल्या पक्षातील नाराज कार्यकर्त्यांची वाट पाहत आहेत. त्यांच्याकडे स्वतःकडे उमेदवार नाहीत. त्यामुळे पक्ष ज्याला संधी देईल, त्या उमेदवाराच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहून घड्याळाचे उमेदवार निवडून आणले पाहिजेत, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले.
भादे येथील शरण्या पॅलेस मंगल कार्यालयात भादे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा बँक संचालक दत्तानाना ढमाळ, माजी जि.प. अध्यक्ष उदय कबुले, माजी कृषी सभापती मनोज पवार, माजी सभापती राजेंद्र तांबे, लोणंद बाजार समिती सभापती सुनिल शेळके, ज्येष्ठ नेते हणमंतराव साळुंखे, माजी जि.प. सदस्या दिपाली साळुंखे, मकरंद मोटे, संभाजीराव साळुंखे, अशोकराव धायगुडे, राजेंद्र कदम, संतोष साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. मकरंद पाटील पुढे म्हणाले, खंडाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागांवर घड्याळाचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. सातारा जिल्हा हा स्व.यशवंतराव चव्हाण आणि किसन आबा वीर यांचा जिल्हा आहे. आज यशवंत विचार बाजूला पडत असून जातीयवादी विचार फोफावत आहे.
खंडाळा तालुक्यासाठी निरा-देवघरचे पाणी देण्यात आपण यशस्वी झालो असून आता उपसा सिंचन योजनेचे टेंडर निघाले आहेत. दहा वर्षांपूर्वी काढलेले टेंडर तत्कालीन सरकारने रद्द केल्याने काम रखडले होते. आता काम सुरू होईल. पाण्यापासून वंचित असलेल्या 14 गावांचा प्रश्न निश्चित मार्गी लावला जाईल. मकरंद पाटील देणार म्हणजे देणारच. लोणंद-खंडाळा-कान्हवडी या 47 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी लवकरच 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. धरणग्रस्तांचे सर्व प्रश्नही मार्गी लावले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नितीन भरगुडे-पाटील म्हणाले की, मकरंद पाटील यांना कोणी आव्हान देत असेल तर खंडाळा तालुक्याने जिल्हा परिषदेच्या 3 आणि पंचायत समितीच्या 6 अशा 9 जागा जिंकून दाखवाव्यात. खंडाळा तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून या बालेकिल्ल्याला कोणीही हात लावू शकणार नाही. प्रास्ताविक राजेंद्र नेवसे यांनी केले. यावेळी नितीन भरगुडे-पाटील, दत्तानाना ढमाळ, उदय कबुले, मनोज पवार, राजेंद्र तांबे, सुनिल शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. आभार राजेंद्र कदम यांनी मानले. मेळाव्यास भादे जिल्हा परिषद गटातील गावागावांतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.