File Photo
सातारा

जिल्ह्यात ‘मिशन शाश्वत ग्रामपंचायत’

जिल्हा परिषदेचा उपक्रम : गावे होणार सौर ऊर्जा स्वयंपूर्ण ग्राम

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात मिशन शाश्वत ग्रामपंचायत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. उपक्रमाच्या अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावे 100 टक्के सौर ग्राम करुन शाश्वत विकासाकडे वाटचाल करणे, हरित ऊर्जेच्या आधारे गाव ऊर्जा स्वयंपूर्ण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश राहणार आहे. उपक्रमात सहभागी गावांची विजेची गरज गावातच पूर्ण होणार आहे.

जिल्ह्यातील मान्याचीवाडी, ता. पाटण या गावाला नुकताच 100 टक्के सौर ऊर्जा ग्राम होण्याचा बहुमान मिळाला आहे. मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने 15 वा वित्त आयोग, माझी वसुंधरा व इतर योजनांमधून मिळालेली बक्षीसाची रक्कम, लोकवर्गणी, सी.एस.आर.फंड अशा विविध निधीतून गावाला संपूर्ण 100 टक्के सौर ऊर्जा स्वयंपूर्ण ग्राम करुन शाश्वत विकासाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. सौर ऊर्जाग्राम निर्मितीची व्याप्ती वाढवण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत गावांचा सहभाग घेऊन ती गावे 100 टक्के सौर ऊर्जा ग्राम करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने केला आहे.

पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातून स्वयंस्फूर्तीने सहभागी 5 गावांची निवड केली आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील कळंबे, आसगाव, धोंडेवाडी, ठोसेघर, फत्यापूर, कोरेगाव तालुक्यात मुगाव, बर्गेवाडी, बोबडेवाडी, बिचुकले, खटाव तालुक्यात काळेवाडी, उंबरमळे, शिंदेवाडी, वरुड, विखळे, माण तालुक्यात दिवड, चिलारवाडी, विरळी, पुकळेवाडी, रांजणी, वावरहिरे, कासारवाडी, फलटण तालुक्यात धुमाळवाडी, सुरवडी, विठ्ठलवाडी, झिरपवाडी, वाठार (निंबाळकर), शिंदेवाडी, ढवळेवाडी (आसू), खंडाळा तालुक्यात साळव, घाडगेवाडी, केसुर्डी, वाई तालुक्यात दरेवाडी, वयगाव, वेळे, चांदवडी, मेणवली, जावली तालुक्यातील चोरांबे, महामुलकरवाडी, म्हाते खुर्द, शिंदेवाडी, तळोशी, महाबळेश्वर तालुक्यात क्षेत्र महाबळेश्वर, मेटगुताड, भिलार, कराड तालुक्यात आदर्शनगर, पवारवाडी, पाचुंद, मुनावळे, बाबरमाची (डिचोली) व पाटण तालुक्यातील बढोरोशी, सुरुल, आबदारवाडी, सुतारवाडी, बनपुरी या गावांचा सहभाग आहे.

या गावांना प्रधान मंत्री सूर्य घर मोफत वीज योजना, जलजीवन मिशन, मागेल त्याला सौर कृषी पंप, पंधराव्या वित्त आयोगामार्फत मिळणारा निधी, लोकवर्गणी व सी.एस.आर.फंडातून मिळणार्‍या निधीचा उपयोग करुन गावाची विजेची गरज गावातच भागवली जाणार आहे. योजना व उपलब्ध निधीची सांगड घातली जाणार आहे. गावातील घरे, शाळा, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा योजना, पथदिवे व इतर कामांसाठी लागणारी वीज सौरऊर्जेद्वारे गावातच निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. हरित ऊर्जेच्या आधारे गाव ऊर्जा स्वयंपूर्ण होत असल्याने पंतप्रधान सूर्यघर: मोफत वीज योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घराच्या छतावर ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी स्वयंप्रेरणेने मिशन शाश्वत ग्रामपंचायत उपक्रमातून 100 टक्के सौर ऊर्जा ग्राम योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT