पाचगणी : पाचगणी, ता. महाबळेश्वर येथून डिसेंबर महिन्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्याला पाचगणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कृष्णा मारोती जाधव (वय 29, रा. खिंगर, ता. महाबळेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. दि. 7 डिसेंबर 2024 रोजी संशयिताने लग्नाचे अमिष दाखवून मुलीचे अपहरण केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. मात्र, या प्रकरणात तपासादरम्यान आरोपी मोबाईल फोनचा वापर करत नसल्याने तसेच पीडित मुलगी वा तिच्या नातेवाईकांशी संपर्क ठेवत नसल्याने शोधमोहिमेत अडचणी निर्माण होत होत्या.
मात्र पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कसोशीने तपास करत आरोपी व पीडित मुलगी यांचा माग काढण्यात आला. यानंतर कळंबोली, नवी मुंबई येथून संशयिताला मलीसह अटक करण्यात आली. सपोनि दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, हवालदार श्रीकांत कांबळे व उमेश लोखंडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.