सातारा : सामाजिक बांधिलकीतून प्रत्येकाने वृक्षारोपणासाठी पुढे यायला हवे. वृक्षारोपणाचे रेकॉर्ड शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याने वृक्षारोपणाचा नुसता दिखाऊपणा किंवा फोटोसेशन चालणार नाही. रस्ते रुंदीकरणानंतर केलेल्या वृक्षारोपणाचे जीपीएस कॉर्डिनेट करण्याचे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अधिकार्यांना दिले.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रेरणेतून सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळ तसेच सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ पोलिस परेड ग्राऊंड येथून रविवारी झाला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन (कोल्हापूर), जिल्हा पोलिसप्रमुख तुषार दोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व दै. ‘पुढारी’चे निवासी संपादक हरीष पाटणे, सह्याद्री देवराईचे संस्थापक सिनेअभिनेते सयाजी शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (पूर्व) श्रीपाद जाधव, कार्यकारी अभियंता (पश्चिम) राहुल अहिरे, कार्यकारी अभियंता होळकर, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, हरित साताराचे कन्हैयालाल राजपुरोहित, दिशा समिती सदस्या रेणूताई येळगावकर उपस्थित होत्या.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, विकास प्रकल्प राबवताना झाडे निघू नयेत, असे सर्वांनाच वाटते. नागरी सुविधा देताना किंवा रस्ता रुंदीकरण करताना कमीत कमी झाडे काढण्याचा प्रयत्न यंत्रणांचा असतो. रुंदीकरण झाले त्याठिकाणी देशी झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. सातार्यात दरवर्षी 1 जूनला वृक्षलागवडीचा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभाग व सातारा पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येईल. हा उपक्रम राबवताना मागील वर्षीची झाडे किती जगली, त्यांची अवस्था काय याचा लेखाजोखा ठेवणे आवश्यक आहे. शंभर दिवसांच्या कार्यक्रमात ज्या-ज्या ठिकाणी रुंदीकरण करुन वृक्षारोपण केले त्याचे जीपीएस कॉर्डिनेट देण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
लावलेली झाडे फुलल्यावर प्रत्येक मार्गाचे वेगळे सौंदर्य खुलणार आहे. सातारा शहराबरोबरच परिसरातील डोंगरांवरील वृक्षांचे प्रमाण कमी झाले आहे. हे डोंगर उजाड व बोडके दिसू लागले आहेत. त्यामुळे डबेवाडीतील तरुणांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. झेडपी मैदानावर फिरण्यासाठी येणारी जशी गर्दी असते त्याप्रमाणे वृक्षलागवडीसाठी प्रतिसाद मिळायला हवा.
संतोष पाटील म्हणाले, पश्चिम घाटातील सातारा शहरासह सर्वच गावे निसर्गसंपन्न आहे. विकास प्रकल्पात नाईलाजाने झाडे काढावी लागतात. ही चूक दुप्पट वृक्षलागवड करुन दुरूस्त करता येऊ शकते. शहराच्या सुंदरतेसाठी जेवढ्या सुविधा महत्त्वाच्या असतात तेवढेच त्याठिकाणचे वातावरणही आल्हाददायक व प्रदूषणमुक्त असणे आवश्यक असते. त्यासाठी वृक्ष महत्वाचे आहेत. हॉस्पिटलच्या बेडवर कृत्रिम ऑक्सिजन मिळतो पण असा ऑक्सिजन घेण्याची वेळ येऊ नये यासाठी झाडे लावावी लागतील ती जगवावी लागतील. वृक्षारोपणासाठी आणलेली रोपे सुदृढ असून काही वर्षांतच सातार्यातील रस्ते हिरवेगार होतील. कुठल्या रस्त्यावर कुठली झाडे लावायची याचे सूक्ष्म नियोजन अधीक्षक अभियंता व मुख्याधिकार्यांनी केले, हे कौतुकास्पद आहे. या नियोजनामुळे वेगळ्याप्रकारचे सौंदर्य सातार्याला लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सयाजी शिंदे म्हणाले, सातार्यात वृक्ष लागवड अभियान वर्षभर सुरू ठेवण्यात येणार असल्याने ही सुखावणारी बाब आहे. जन्मल्याबरोबर आपणास ऑक्सिजनची गरज भासते. आईनंतर ऑक्सिजनची गरज झाडांमुळे पूर्ण होते. त्यामुळे वृक्ष हेच खरे सेलिब्रेटी आहेत. माणूस झाडाच्याच सावलीला बसतो. आठ-दहा वर्षांपासून देवराईच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे काम सुरु असून या उपक्रमास भेट द्यावी. राज्यात 40 देवराया करण्यात येणार आहेत. झाड गुण घेऊ आणि झाडाचे गुण गाऊन जगूया, असे आवाहन त्यांनी केले. रेणूताई येळगावकर यांनी आभार मानले. दरम्यान, सातारा-लोणंद मार्गाच्या दुतर्फा तसेच सदरबझारमध्ये विविध देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारी यंत्रणांवर जबाबदारी ढकलून चालणार नसून सामाजिक बांधिलकीतून प्रत्येकाने पुढे यायला हवे, असे आवाहन करून ना. शिवेंद्रराजे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम व पालिकेच्या मोठ्या ठेकेदारांनी वृक्षारोपणाची जबाबदारी घ्यायला हवी. प्रकल्पासाठी ठेकेदार रस्ते रुंदीकणात झाडे तोडत असल्यामुळे त्यांनीच वृक्षारोपणात पुढाकार घ्यायला हवा. या उपक्रमासाठी ठेकेदारांनी सहकार्य करावे. शेवटी सगळ्यांची बिले काढायचे माझ्याच हातात आहे. मुंबईत फाईलवर सही झाल्याशिवाय बिल निघत नाहीत, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ठेकेदारांना अशी सार्वजनिक हिताची कामे दाबून सांगतात येतात, असेही ना. शिवेंद्रराजे म्हणाले.