खटाव : सातारा जिल्हा परिषद निवडणुकी अगोदरपासून भाजपने खेळलेल्या अनाकलनीय चालींमुळे बॅकफुटवर गेलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची धाकधुक वाढली आहे. स्वबळावरील बहुमत नसतानाही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत भाजपने सेना आणि राष्ट्रवादीला दिलेले धक्के सहन झाले नव्हते. सभापती निवडीतही पुन्हा एकदा भाजपने जोरका झटका देत जिल्हा राष्ट्रवादीला जेरीस आणले आहे.
सभापती निवडीत ग्रामविकास मंत्र्यांना प्लॅन डी वापरण्याची वेळ आली नसली तरी सध्याची परिस्थिती पाहता तो प्लॅन विनासायास वर्कआऊट होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सातारा झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीतील राड्यानंतर राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील मंत्र्यांच्याच पाठिशी पक्ष ताकदीने उभा राहिला नसल्याची भावना पदाधिकाऱ्यांची झाली आहे. त्यामुळे हेलखावे खाण्यापेक्षा भवितव्याचा विचार करत राष्ट्रवादीचे आणखी काही जण प्लॅन डी मध्ये स्वतःहून सहभागी होण्याची शक्यता आहे.
सातारा झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्यानंतर सभापतीपदांच्या निवडणुकीतही उलटसुलट घडण्याची शक्यता होती. प्री पोल अलायन्सचा ढोल बडवणाऱ्या सेना-राष्ट्रवादीचा फुगा एकदा फोडल्यानंतर भाजपने गाफील न राहता प्लॅन ए, बी, सी एक्झिक्युट केले. सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचे आणखी काही सदस्य गळाला लावले. दुसरीकडे सेना-राष्ट्रवादीने एकूण रागरंग पाहून प्रशासनाच्या निषेधाची टिमकी वाजवत अप्रत्यक्षपणे निवडणुकीतून माघार घेतली. झेडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी दिवसभर घमासान झाले. सेना-राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील मंत्री शंभूराज देसाई व मकरंद पाटील यांनी पोलिस व प्रशासनाने केलेल्या दडपशाहीचा पाढा वाचून त्यात सहभागी सर्वांना निलंबित करण्याची मागणी केली.
विधान परिषदेच्या उपसभापतींनी तसे निर्देशही सरकारला दिले, मात्र भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार प्रतिवाद करत त्यांची बाजू मांडली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सेना-राष्ट्रवादीच्या मंत्री, आमदारांनी साताऱ्यातील राड्याचा निषेध केला त्यावेळी शिवसेनेचे बहुतांश मंत्री, आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांच्याबरोबर झाडून सगळी राष्ट्रवादी त्याठिकाणी हजर असायला पाहिजे होती, मात्र तसे चित्र दिसले नाही. विधीमंडळ सभागृहातही शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी जोरदार बाजू मांडली. राष्ट्रवादीच्या काही मोजक्या आमदारांशिवाय कुणीच आवाज उठवण्याचा पवित्रा घेतला नाही. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सभागृहात व बाहेर कुठेही याबाबत एकही विधान केले नाही. त्यातच आता राष्ट्रवादीत वरिष्ठ पातळीवर सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या पॉवरफुल नेत्यांमध्ये कुरबुरी सुरु झाल्याच्या बातम्या येवू लागल्याने सातारा जिल्हा राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली आहे.
दबक्या आवाजात पक्षाच्या भवितव्याची चर्चा होवू लागली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर भाजपची राक्षसी महत्वाकांक्षा यापुढेही जिल्ह्यात उतमात माजवणार असल्याने आपले राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याकडे अनेकांचा कल वाढू लागला आहे. हे चित्र पाहता ग्रामविकास मंत्र्यांना झेडपी सभापती निवडणुकीत प्लॅन डी एक्झिक्युट करावा लागला नसला तरी तो प्लॅन विनासायास वर्क आऊट होण्याची शक्यता वाढली आहे.