फलटण : गेली ३० वर्षे सत्ता, मंत्रीपदे, आमदारकी, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसह सर्व अधिकार हातात असूनही विरोधकांना फलटणचा अपेक्षित विकास साधता आला नाही. आता रखडलेली विकासकामे पूर्णत्वास जात असल्याने श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र विकास रोखणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देत आहे, अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली.
फलटण पंचायत समितीच्या नव्या सभापती निवासस्थानाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, दिलीपसिंह भोसले, सभापती शिवांजली भोसले, जिजामाला नाईक-निंबाळकर, उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे उपस्थित होते.
ना. गोरे म्हणाले, ‘तीस वर्षे धूळ खात पडलेल्या सभापती निवासाकडे विरोधकांनी कधीच लक्ष दिले नाही. इमारत पूर्ण झाल्यानंतर मात्र २०२० मधील पत्रे दाखवून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनता आता सत्य ओळखून आहे.’ रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे जनतेत मिसळून काम करणारे नेतृत्व आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि आ. सचिन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे फलटणच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. हा विकास विरोधकांच्या डोळ्यात खुपत असल्याने ते सातत्याने राजकारण करत आहेत. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे फलटणच्या विकासाला आता कोणतीही अडचण येणार नाही.
मुख्यमंत्री सडक योजनेतून प्रारंभी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. तसेच ग्रामीण रस्ते, पंचायत समितीची विकासकामे, विविध शासकीय कार्यालये आणि मूलभूत सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. गेल्या वर्षभरात निवडणुकांमुळे अपेक्षित वेळ देता आला नाही. मात्र आता फलटणच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. प्रसंगी माझ्या मतदारसंघातील एखादे काम थांबले तरी चालेल; पण फलटणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. विरोधकांनी अनेक वर्षांत जितकी कामे केली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकासकामे पुढील पाच वर्षांत उभी करू, असेही ते म्हणाले.
आ. सचिन पाटील म्हणाले, तीस वर्षे सत्ता आणि दोन आमदार असूनही सभापती निवास उभारता आले नाही. भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेल्या या इमारतीचे आज लोकार्पण होत आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण रस्ता सिमेंट काँक्रीटचा व्हावा, हीच पुढील विकासाची दिशा आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी मंजूर केलेली इमारत आज पूर्णत्वास आली आहे. विरोधकांकडे विकासाचा मुद्दा उरला नसल्याने ते केवळ आरोप आणि दिशाभूल करत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, बाणगंगा नदीचे सुशोभीकरण आणि शासकीय कार्यालये फलटणमध्ये आणून तालुक्याचे विकासचित्र बदलणार आहे.
स्वागत सभापती शिवांजली भोसले यांनी केले, तर गटविकास अधिकारी अक्षय घावटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नगरसेवक रोहित नागटिळे, संदीप चोरमले, सनी अहिवळे, जयकुमार शिंदे, अमित भोईटे, बापूराव शिंदे, मिलिंद नेवसे, रामभाऊ ढेकळे, विश्वासराव भोसले उपस्थित होते.