म्हसवड : स्वातंत्र्यदिनानिमित्त म्हसवड पोलिसांनी नागरिकांना अनोखी भेट दिली. सीएआयआर पोर्टलच्या प्रभावी वापरातून गहाळ झालेले ९ लाख ७० हजार रुपये किमतीचे ४८ महागडे स्मार्टफोन शोधून काढून ते मूळ मालकांना परत करण्यात आले.
म्हसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारी वाढल्यानंतर प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमन यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला शोधमोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. पथकाने तांत्रिक कौशल्याचा वापर करून महाराष्ट्रासह परराज्यांत गेलेल्या मोबाईलचा शोध घेतला. संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून ४८ मोबाईल हस्तगत करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन माने, नगराध्यक्षा पूजा विरकर व नगरसेवकांच्या हस्ते मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले.
मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी म्हसवड पोलिस आणि सातारा जिल्हा पोलिसांचे आभार मानले. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमन व पोलिस उपनिरीक्षक अमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस अंमलदारांनी मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.