Mhaswad accident Pudhari
सातारा

Mhaswad accident: अपघातात आजोबा व नातीचा दुर्दैवी मृत्यू

धुळदेवजवळ खड्डे चुकवताना कार पलटी; चौघे गंभीर

पुढारी वृत्तसेवा

म्हसवड / हिंगणी : सातारा-पंढरपूर मार्गावरील म्हसवडपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या धुळदेव (ता. माण) येथे शुक्रवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. रस्त्यावरील खड्डे चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार तीन वेळा पलटी झाली. या अपघातात अजोबा व नात जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

अशोक विष्णू निकम (वय 70) व लक्ष्मी सचिन निकम (वय 13, दोघे रा. कोडोली, ता. सातारा) असे अपघातात ठार झालेल्या आजोबा व नातीचे नाव आहे. तर सचिन निकम, पुनम निकम, द्वारका निकम व वरद निकम अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथील अशोक निकम यांच्यासह सहाजण कारने पंढरपूर व तुळजापूर येथे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यांची कार शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सातारा-पंढरपूर मार्गावरील म्हसवडपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या धुळदेव (ता. माण) येथे आली. दरम्यान, रस्त्यावरील खड्डे चुकवताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार तीन वेळा पलटी झाली. या अपघातात सातारा येथील निकम कुटुंबीयांपैकी अशोक निकम व लक्ष्मी निकम हे जागीच ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने म्हसवड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सातारा येथे पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलिस अभिजीत भादुले, लुबाळ व हांगे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य केले. या अपघाताची म्हसवड पोलिस ठाण्यात नोंद झाली असून तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करत आहेत.

दरम्यान, गेल्या आठ वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले असून या मार्गावर आतापर्यंत 20 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. सतत होणाऱ्या अपघातांमुळे धुळदेव परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नामुळे रस्ते व पुलाचे काम रखडले असल्याचे सांगितले जात असून, हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT